Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
फर्ग्युसन कॉलेजला रामराम.

शास्त्रावरही त्यांचा दांडगा व्यासंग, रानडे आणि ग. व्यं. जोशी यांच्याजवळ सर्व प्रश्नांचा त्यांनीं साधकबाधक रीतीनें ऊहापोह केलेला. या सर्व गोष्टींमुळे त्यांची शिकवणूक अधिकारी शिक्षकाप्रमाणें असे. त्यांच्या अस्खलित आणि सुंदर भाषापद्धतीनें मुलांस फार आनंद वाटे. असा योग्य शिक्षक आपल्यामधून जावा याची विद्यार्थ्यांस साहजिक खिन्नता व उद्विग्नता वाटली. परंतु खालच्या पायरीवरून ते वरच्या पायरीवर जात आहेत, हिंदुस्थानच्या कारभाराची दिशा कशी असावी याचें शिक्षण सरकारास देण्याकरितां आपले गुरुजी जात आहेत या विचारानें त्यांस आनंदही झाला. गोखल्यांनी सप्टेंबरमध्ये शेवटचें भाषण करून दोन वर्षांची फर्लो घेतली. १९ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनीं त्यांस मानपत्र अर्पण केलें. त्यास उत्तर देतांना गोखल्यांचे गोड व मृदु मन भरून आलें. ज्या शिक्षण संस्थेत आगरकर, टिळक यांच्या थोर उदाहरणामुळें आपण शिरलों, टिळक सोडून गेले असतां आणि पुढे आगरकर, केळकरांसारखे मोहरे अकालीं निवर्तले असतां, जिची धुरा आपणावर घेतली, जिच्यासाठीं नाना कष्ट करून पैसा जमा केला, जिच्यासाठीं पैशानेही न मिळणारी अशीं नवीन विद्वान् माणसें गोळा केली, ज्या शिक्षण-संस्थेची सर्वतोपरी भरभराट व्हावी म्हणून आपल्या आयुष्यांतील ऐन उमेदीचीं, उत्साहाचीं, ज्या वेळेस लाथ मारूं तेथे पाणी काढू असा हिय्या असतो, मान मिळवूं, पैसा कमावूं, लोकांस चकित करूं अशी महत्त्वाकांक्षा असते, अशीं वर्षे निरपेक्षपणे तनमनधन खर्च करून वाहिलीं, जेथें आपले मित्र आणि आपले लाडके शिष्य होते तें सर्व सोडून आज त्यांस जावयाचें होतें. जुने बांधलेलें घर सोडून पुनः नवीन घर बांधण्यास जावयाचें होतें. कॉलेजमधील कामांत विशेष दगदग नव्हती; काळजी नव्हती. विद्यार्थी बरे, आपलीं पुस्तकें बरीं, आपले काम बरें. आतां ते लोकांपुढे जाणार होते. सरकारपुढे छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून झगडण्यासाठी ते जाणार होते. स्वतःच्या जबाबदारीचीं त्यांस जाणीव होती. त्यांनी आपल्या भाषणांत तुफान दर्यात होडी लोटणाऱ्या कोळ्याची गोष्ट सांगितली. क्षणांत पर्वतप्राय लाटांच्या 'आ' पसरलेल्या जबडयांत आपण गिळंकृत होणार असें त्यास वाटतें तर दुसऱ्या क्षणीं त्याची होडी