Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
गोखल्यांची लोकसेवा.

हा तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध आणि गोड अभंग आळवून आळवून म्हणत होते. अर्थाशीं त्यांची झालेली समरसता पाहून गोपाळरावांस काय बरें वाटलें असेल?
 १८९८ मध्यें गोपाळरावांनी माफीसंबंधानें आपल्यावर केल्या गेलेल्या आरोपास सविस्तर उत्तर प्रसिद्ध केलें, त्यांत त्यांनी शेवटीं खालील उद्गार काढले आहेत. "Several of my Indian friends have been equally kind foremost among them being the gentleman at whose feet I have now sat for these many years as a pupil."
 लोकांनी टीका केली तरी रंजले गांजलेल्यांच्या दुःखाचा परिहार करण्याचें स्तुत्य काम गोखल्यांनी टाकलें नाहीं. अजून प्लेग हटला नव्हता. त्यांनीं एक स्वयंसेवकांचे पथक उभारलें आणि लोकांस पुष्कळ. सहाय्य केलें, टोंचून घेण्याचा उपदेश केला व त्यांच्या भोळ्या समजुती नाहीशा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामगिरीचा गौरवपर उल्लेख सरकारी रिपोर्टात सर क्लीग यांनी केला होता.
 १८९९ मध्ये इनॉक्युलेशन संबंधी एक सरकारी कमिशन बसलें. हा उपाय धोक्याचा आहे किंवा काय, यानें दुसरींच दुखणीं जडतात असे लोक म्हणतात त्यांत किती तथ्य आहे, सांधेदुखी उत्पन्न होते की काय यांची चवकशी करण्याकरितां हें कमिशन नेमलें होतें. गोखल्यांची या कमिशनवर नेमणूक झाली होती. कारण त्यांच्यावर सरकारचा विश्वास बसला होता. निरनिराळ्या ठिकाणी चवकशी झाली. विशेषतेः धारवाड, बेळगांव येथे जास्त साक्षी घेण्यांत आल्या. सर्व सभासदांचे मत इनॉक्युलेशन हा उपाय चांगला आहे असेंच पडलें. गोखल्यांनी आपली स्वतंत्र पत्रिका जोडिली होती. तींत ते म्हणतात 'जरी कांहीं इसमांस या उपायानें अन्य रोग जडला असला, तरी टोचला जाणारा जो असेल त्याची वयोमर्यादा आणि त्याची शक्ति नीट लक्षांत घेऊन तज्ज्ञ माणसाकडून लस टोचविल्यास हा उपाय लोकांस भोवणार नाही व परिणाम चांगलाच होईल.'