Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९
टिळक व गोखले - तुलना.

होता. टिळक आणि आगरकर टीकेस कधीं भ्यावयाचे नाहीत. लंगड्या पायानें सुद्धां ते समरांगणांत नाचावयाचे, चमकावयाचे. टिळक हे तत्त्वज्ञ होते. तत्त्वज्ञानाने येणारा कठोरपणा त्यांच्यांत आला होता. टीकेकडे त्यांचें विशेष लक्ष नसे. ते टीका विसरून जात आणि त्यांस वाटे कीं, दुसराही टीका विसरून जाईल. दुसरा इतके दिवस टीका उराशी धरून कसा बसतो याचें त्यांस आश्चर्य वाटे. स्वतःस टीकेची खिजगणती नसल्यामुळे दुसरेही असेच असतील या समजुतीने ते टीका करीत. परंतु गोखल्यांची मनःस्थिति निराळी होती. टिळकांच्या मनोगिरीवर किती कां मुसळधार पाऊस पडेना? त्याचा एक कोपराही ढांसळावयाचा नाहीं. परंतु गोखल्यांचें अंतःकरण देशावरील मृदु आणि भुसभुशीत मातीप्रमाणे होते; पावसाचे चार थेंब पडले तरी ते आतपर्यंत जावयाचे. त्यांचें मन लोण्याप्रमाणें होतें. तें परदुःखाने वितळे तसेच टीकेनेही वितळे! टिळकांचें मन जरी परक्याच्या दुःखाने कळवळलें तरी टीकेनें- स्वतःच्या दुःखाने वा स्वतःवरच्या टीकेने कधीही वितळून जात नसे. अशा प्रसंगी ते वज्राप्रमाणें कठिण बने, सार्वजनिक काम करणारा असाच खंबीर लागतो. गोखल्यांनी देशाचं हित केलें, सार्वजनिक काम केली परंतु दुखावलेल्या मनानें केली. दुखावलेले मन पुनः साफ बरे झाले नाहीं. वाग्बाण निघून गेला तरी त्यानें केलेला व्रण राहतो म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. १८९७ सालची काँग्रेस वऱ्हाडांत अमरावतीस भरावयाची होती. गोपाळरावांच्या इंग्लंडमधील कामगिरीचा गौरवपूर्वक उल्लेख करावयाचा तें तर बाजूसच राहिलं; उलट त्यांच्या माफीबद्दल निषेध करणारा ठराव पास करावा असे दुसऱ्याचें वाईटच पाहणाऱ्या कित्येक लोकांस वाटले. परंतु गोष्टी या थराला आल्या नाहीत. तेथे गोखल्यांचे अभिनंदनही झाले नाहीं किंवा निंदाप्रदर्शक ठरावही पास झाला नाहीं. अमरावतीच्या काँग्रेसहून परस येतांना गोपाळरावांस एका प्रसंगाने आपल्या गुरूची अंतःकरण-ओळख जास्तच झाली. माधवरावांच्या प्रकृतीमधले दैवी तेज पुष्कळांस दिसलें होतें. भांडारकर तर रानड्यांचें सांगणें म्हणजे दैवी संदेश असें समजत. रानडे पहाटेच्या वेळेस उठून 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले'