पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समजानुवर्ती, समाजशील कसा होईल हे पाहायला हवे. सामाजिक संयम व सहनशीलता, पर्यावरण जागरूकता व संवर्धन, कार्यसंस्कृती, सार्थक जीवनभान यातूनच समूह जीवन विकसित होते याचे भान शिक्षणातून देणे.
५) व्यष्टीतून समष्टीकडे जाण्यास शिकणे (Learning to transform oneself to society) -
 शिकण्याच्या सर्व क्रिया, प्रक्रियांतून उपजत एकात्म विकासाचे भान देणे, जेणेकरून माणूस हा भविष्याची जबाबदारी पेलण्यास सक्षम होईल. ही सारी मूल्ये, कौशल्ये, जाण, भान घेऊन गेल्या दशकात जगभरात तयार झालेल्या नव्या पिढीपुढील प्रश्न व आव्हाने लक्षात घेऊन २०१५ नंतरच्या शिक्षणाचा आराखडा तयार करण्याचे कार्य राष्ट्रसंघाने हाती घेतले असून त्याचा जो मसुदा तयार करण्यात आला आहे तो पाहता भविष्यलक्षी शिक्षणातील अपेक्षित बदल ध्यानात येतील.
 तत्पूर्वी जगातील श्रेष्ठ विद्यापीठ म्हणून अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाने शिक्षणातील गुणवत्ता शाश्वत ठेवली कशी हे समजून घेणे अशासाठी आवश्यक आहे की शतकानुशतके एखादी शिक्षण संस्था सातत्याने जेव्हा गुणवत्ता टिकवते तेव्हा तिचे व्यवस्थापकीय कौशल्य जितके महत्त्वाचे तितकेच कालानुक्रमिक शिक्षण बदलाचे तिचे भानही ! हार्वर्ड विद्यापीठ १६३६ साली सुरू झाले, ते साधे कॉलेज म्हणून. ते आहे अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट परगण्यातील केंब्रिज येथे. इंग्लंडचं केंब्रिज विद्यापीठ व याचा तसा संबंध नाही. आज हे जगातले सर्वात श्रीमंत विद्यापीठ म्हणून गणलं जाते. त्याची श्रीमंती अनेक अंगांनी सांगता येईल. एक तर हे खासगी विद्यापीठ आहे. जॉन हार्वर्डनी या विद्यापीठास १६३९ मध्ये सुमारे ७८० पौंड स्टर्लिंगची देणगी दिली व त्यांचे नाव तत्कालीन कॉलेजला देण्यात आले. कालौघात कॉलेजचे रूपांतर विद्यापीठात झाले. पण यापेक्षा त्या काळात मिळालेल्या ४०० पुस्तकांचे महत्व विद्यापीठास आजही वाटते हे विशेष! आजमितीस सुमारे २०,००० विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेतात. या विद्यापीठामार्फत ४६ पदवीपूर्व अभ्यासक्रम, १३४ पदवी अभ्यासक्रम. आणि ३२ व्यावसायिक पदव्यांचे शिक्षण दिले जाते. सध्या हार्वर्ड विद्यापीठात वैद्यकशास्त्र (Medicine), देव, धर्म (Divinity), विधी (Law), दंतचिकित्सा (Dental Medicine), कला व विज्ञान (Arts and Science), व्यवसाय (Business), विस्तार (Extension), रचना (Design), शिक्षण (Education), सार्वजनिक आरोग्य (Public Health), प्रशासन (Government), अभियांत्रिकी व उपयोजित विज्ञान

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९८