पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(Engineering and Applied Sciences) या विद्याशाखातील अध्ययन, अध्यापन, संशोधन कार्य चालते. ३२ शतलक्ष डॉलर्सची गंगाजळी असलेल्या या विद्यापीठाचा परिसर २०० हेक्टर्सचा आहे. निसर्गरम्य अशा या परिसरात क्रीडा, संगीत, मनोरंजन, निवास, ग्रंथालय, प्रयोगशाळा इ. संदर्भातील सर्व अद्ययावत सोयी असून संगणक, इंटरनेट, उपग्रह इत्यादींची स्वत:ची आस्थापना आहे. या विद्यापीठाची खरी श्रीमंती म्हणजे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी. ४३ नोबेल पुरस्कारधारक, ४९ पुलित्झर पुरस्कारधारक विद्यार्थी ही या विद्यापीठाची खरी श्रीमंती! अमेरिकेचे अनेक राष्ट्राध्यक्ष, सिनेटर्स, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ या विद्यापीठाने दिले.
 हार्वर्ड विद्यापीठ जगातील प्रथम क्रमांकाचे शिक्षण केंद्र म्हणून जे प्रसिद्ध आहे, त्याचे रहस्य विद्यापीठाच्या खालील वैशिष्ट्यात दिसून येते-
१) त्या त्या विषयातील जगातील श्रेष्ठ शिक्षक नेमण्याचा हार्वर्ड विद्यापीठाचा पहिल्यापासून लौकिक आहे. आजमितीस २०,००० विद्यार्थ्यांना २००० प्राध्यापक शिकवतात. अन्य १२,००० कर्मचारी पूरक सेवा बजावतात.
२) विद्यार्थी केंद्रित प्रेरक वातावरण निर्मितीवर विद्यापीठाचा भर असतो. त्यामुळे जगातील अत्यंत हुषार विद्यार्थ्यांचा ओढा या विद्यापीठाकडे असतो.
३) विद्यापीठामार्फत इतके अभ्यासक्रम, विषय शिकविले जातात की त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीचा अभ्यासक्रम व तोही त्याच्या आवडत्या विषयात निवडण्याचे पर्याय हेच या विद्यापीठाच्या यशाचे खरे रहस्य होय.
४) शैक्षणिक वातावरण, व्यक्तिमत्त्व विकासास वाव, प्रोत्साहन, साहाय्य अशा प्रकारचा वाव देणाच्या सुविधांची रेलचेल.
५) नेतृत्व गुणास वाव व नोकरीची हमी हे या विद्यापीठाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मानले जाते.
६) निवासी सुविधा असलेले हे जगातले मोठे विद्यापीठ. त्यामुळे कँपस कल्चर विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.
७) हार्वर्ड विद्यापीठाचे ग्रंथालय हे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वाधिक सुविधा, अद्ययावत विपुल ग्रंथ संपदा, संदर्भ संग्रह, जागतिक संपर्क सुविधा केंद्र म्हणून या ग्रंथालयाकडे पाहिले जाते. विद्यापीठ परिसरात छोटीमोठी ७० ग्रंथालये आहेत.
८) भाषा, प्रांत, देश, संस्कृती, वंश, लिंग इ. दृष्टीने पाहायचे तरी हे खरे जागतिक विद्यापीठ ठरते.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९९