पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकाशित केला. त्यातून शिक्षणाद्वारे माणसाच्या अंतर्विकासाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले. ते प्राप्त करण्यासाठी चार मूलभूत गोष्टी ठरविण्यात आल्या. त्यानुसार १) प्राथमिक शिक्षणात मूलभूत सुधारणा करणे, २) वर्तमान शिक्षणक्रमाची पुनर्रचना करणे, ३) शिक्षक प्रशिक्षण, आणि ४) विविध प्रकारच्या शिक्षण स्वरूपात (औपचारिक, अनौपचारिक व माध्यम शिक्षण) बदल करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रथमच शिक्षणास जीवनाचा निरंतर घटक ठरविण्यात आले. कारण मनुष्य जीवनभर शिकत रहिला तर जीवनभर तो विकसित व सक्षम होत राहणार, हा त्यामागचा तर्क नि विचार होता.
 अंतर्विकासाच्या शिक्षणात गेल्या दशकभराच्या काळात (२००५ ते २०१४) दिल्या गेलेल्या शिक्षणात पाच गोष्टींवर भर देण्यात आला होता,
१) समजून घ्यायला शिकणे (Learning to know) -
 या अंतर्गत शाश्वत विकासातील निसर्ग सहभाग व योगदान यांची जाणीव करून देण्यात आली. तसेच समाजात गरजा ह्या निरंतर वाढत असतात याचे भान देण्यात आले. स्थानिक गरजांच्या पूर्ततेचा वैश्विक पातळीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास झाला. त्यातून वैश्विक व स्थानिक गरजांच्या अंतर्संबंधांची गुंतागुत स्पष्ट झाली. यामुळे विश्वभान येण्यास साहाय्य झाले.
२) कृतिशीलता शिकणे (Learning to do) -
 आपल्या दैनंदिन जगण्यात यथार्थतेचे भान असणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दैनंदिन गरजा, क्रिया, उपक्रम, निर्णय याचा जो परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत असतो, त्याची आपणास जाणीव हवी. ती व्हायची व तिचा विकास व्हायचा तर आपल्या आजूबाजूच वातावरण सुरक्षित हवं. कारण ते तसे असेल तरच आपला विकास होणार.
३) जगायला शिकणे (Learning to be) -
 माणूस म्हणून जगत असताना तत्त्व आणि मूल्यांचे असाधारण महत्त्व असतं. ते घेऊन जगणं म्हणजे माणूस म्हणून जगणे. तसे जगत असताना पर्यावरण, समाज आणि आर्थिक स्थिती यांचीही जाण हवी. माणसाच्या जगण्यात समग्रपण येते ते शरीर व मनाचा समतोल विकास, बुद्धीचे संतुलन, संवेदनशीलता, सौंदर्य आस्वाद आणि आत्मिक समाधान या गोष्टींनी यामुळे तो माणूस होतो.
४) समूह जीवन शिकणे (Learning to live together) -
 जगत असताना आत्मकेंद्रिततेस छेद देऊन आपला प्रत्येक निर्णय

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९७