पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्तमान शिक्षणापुढील नवी आव्हाने


 गेल्या पंचवीस वर्षांत जागतिकीकरण, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती यामुळे जग बहुभाषी, बहुदेशी, बहुसांस्कृतिक न राहता उलटपक्षी ते सपाट, एकभाषी, एकसांस्कृतिक होते आहे, यालाच जगाचे खेडे होणे (Worldwide Village) म्हणतात. ते संपर्क साधनांच्या विकासामुळे 'वायरलेस' झालेय, यातूनच एके काळचे गोल जग सपाट झाले. काळ, काम, वेगाचे गणित बदलून ते 'स्वकेंद्री' झाले. तुम्ही ठरवले तर 'समाजशील' नाहीतर 'स्वयंभू' होणे शक्य झाले आहे, या बदलत्या समाज परिप्रेक्ष्यामुळे सर्वाधिक बदल जर कोणत्या क्षेत्रात झाले असतील तर शिक्षणात.
 जागतिकीकरणामुळे शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा बदल भाषेच्या 'माध्यम' म्हणून असलेल्या संकल्पनेवर झाला. पूर्वी परिसर भाषा हे संवाद, व्यवहार, शिक्षणाचे साधन होती. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे व तंत्रज्ञानाची माध्यम भाषा म्हणून इंग्रजी जगाची संपर्क आणि ज्ञानभाषी बनली. संगणक इंटरनेट, सॉफ्टवेअर भाषा म्हणून इंग्रजीचा केंद्रीय विकास हे त्याचे प्रमुख कारण होय. एके काळी जपान, जर्मनी, फ्रान्स हे स्वभाषेचे कट्टर पुरस्कर्ते असलेले देश गेल्या पंचवीस वर्षांत इंग्रजीमय झाले ते केवळ संपर्क क्रांतीची भाषा इंग्रजी झाली म्हणून. शिवाय, बहुराष्ट्रीय बँका, कंपन्या, व्यापार, आंतरराष्ट्रीय संघ, संघटनांची व्यवहार भाषा इंग्रजी होणे हेही त्याचे एक कारण होय. परिणामी इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय शिक्षणाची माध्यम भाषा झाली. मला जर जग जिंकायचे असेल तर इंग्रजी येणे अपरिहार्य, अनिवार्य बनले, याचे भान सामान्यातल्या सामान्य नागरिकास जगभर झाले. परिणामी वाडी, वस्ती, डोंगर, कपारीतील शेळी, मेंढी पाळणारा धनगर, भटके, मजूर, कबाडी, कुणबी सारे 'हॅलो' म्हणू लागले. मोबाईलने

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९१