पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(Entrepreneurship) असायला हवी. शाळेच्या ग्रंथालयात उद्योगपती, वैज्ञानिक, संशोधक यांची चरित्रे, आत्मकथने हवीत, ती आपल्या अभ्यासक्रमाचाही भाग व्हावीत.
 जपानला त्सुनामी येऊनही त्यांनी जगाची मदत नाकारली व दुसरे दिवशी देश पूर्ववत सुरू होईल याकडे लक्ष दिले. कारण त्यांना सतत भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामीला तोंड द्यावे लागले, ते सतत तत्पर असतात कारण आपत्ती व्यवस्थापन त्यांना बालवाडीपासून शिकवले जाते हे मी जपानमध्ये असताना पाहिले आहे. शिवाय प्रतिबंधात्मक उपायांचे शिक्षण देण्यावरही जगात भर असतो. या दृष्टीने आपण दुष्काळ, पूर, भूकंप, अतिवृष्टी इ. शिकवायला नको का? जलस्वराज्य, जल प्रदूषण, पाण्यांचा साठ्यांचा काटकसरीने वापर, तळी इ. चे पुनर्भरण, शेतीच्या पाण्याची शाश्वती, पाऊस पाण्याची जिरवण का नाही आपल्या शिक्षणाचा भाग?
 राजकीय जागृतीस छेद देणारी सामाजिक जाणीव, नियमितपणा, सचोटी, साधेपणा, सण-समारंभात, विवाहात काटकसर, महाप्रसाद भोजनावळीस प्रतिबंध वा नियंत्रण, कायदा पालनातील प्रतिष्ठा, जे माझं नाही त्याला स्पर्श न करण्याची दक्षता या साच्यातूनच देश घडतो ना? देश घडणीचे शिक्षण हेच जर 'आंतरभारती शिक्षण' होऊन जाईल तर त्याचं अनुकरण जग नाही का करणार? चार दशकांचा प्रवास पूर्ण करत आपण जेव्हा सुवर्ण महोत्सवाचे स्वप्न न्याहाळत असतो तेव्हा विकासाच्या नव्या लक्ष्यभेदाचे भान आपण ठेवलं पाहिजे. एक टप्पा पार केला की दुसऱ्याचे वेध लागले पाहिजे. आपण आपले शिक्षण, संस्था, शाळा, शिक्षक, भौतिक समृद्ध करणार की मूल्याधिष्ठित बनवत ते गुणवत्ताप्रधान करणार यावरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. साने गुरुजींनी त्यांच्या काळात देश स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते. आपण देश समृद्धीचे स्वप्न पाहू, साकार करू.

◼◼◼

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९०