पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वांना समान करून टाकले तसे टी.व्ही चॅनल्सनीही. मूल हातपाय हालवू लागले, खेळू लागले, खेळणी वापरू लागले की ते संगणक साक्षर होते ते दोन साधनांमुळे. एक रिमोट आणि दुसरे मोबाईल फोन्स. उपजत त्याला ऑन, ऑफ, क्लिक, कट, पेस्ट, फॉरवर्ड, सेंड, प्रिंट, गेम्स, कॅलक्युलेटर्स सारे न शिकवता येऊ लागते. ही नवी पिढी उपजत त्रैभाषिक पिढी बनून गेली आहे. घर मातृभाषा शिकवते, शाळा इंग्रजी तर टीव्ही हिंदी पण एक भाषा धड न येणारी ही पिढी संकरित भाषेत वाढते, बोलते. "मम्मा, चाय फिका आहे" म्हणणारी पिढी एकभाषी पालकांपेक्षा नक्कीच संवाद कुशल. भाषा म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ, व्याकरण नाही. भाषा म्हणजे मला म्हणायचे ते दुसऱ्यास कळले म्हणजे झाले. यामुळे स्वभाषा, मातृभाषा, भाषाभिमान गोष्टी कालबाह्य ठरत आहेत याचं भान येणारे, आलेले पालक आपली मुले सेमी इंग्लिश, इंग्लिश शाळात पाठवतात, ते त्यांच्या काळाची पावले ओळखण्याच्या शहाणपणातून. हे शहाणपण ज्या शाळा अंगीकारतील त्या शाळातील मुलेच नव्या काळाचे, जगाचे, वर्तमानाचे आव्हान पेलण्यास समर्थ होणार हे सांगायला आता भविष्यवेत्त्याची गरज उरली नाही.
 बदलत्या वर्तमानामुळे शाळेच्या विषयात ही बदल होत आहेत. विषयांचे स्वरूप झपाट्याने बदलते आहे. पूर्वी भाषा म्हणजे गद्य, पद्य, व्याकरण आणि लेखन. आता भाषा म्हणजे संवाद, अनुवाद, आकलन, संपर्क कौशल्य (एसएमएस, व्हॉटस् ऍप, ई-मेल) पूर्वी विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, आता विज्ञान म्हणजे साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद विज्ञान, शैली विज्ञान, समाजशास्त्र, मानववंश शास्त्र, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, हवामानशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, प्राणीशास्त्र, भूविज्ञान, वायुविज्ञान, अवकाशशास्त्र, खगोलशास्त्र, फॅशनशास्त्र, देहबोली विज्ञान, व्यवसायशास्त्र, विमा शास्त्र, बँकिग. जीवनाचे प्रत्येक क्षेत्र विज्ञान होऊन गेल्याने विज्ञान संकल्पना समजून घेतली की सारी ज्ञान-विज्ञाने तुम्हास शिकता येतात. कोणतीही टू व्हीलर अथवा मोटार शिका आणि मग कोणतेही मॉडेल चालवा, तसेच विषयांचे झाले आहे. गणित म्हणजे अंकमोडही कल्पना बदलून गणित म्हणजे संकल्पना विकास विस्तार. तो तुम्ही किती सूक्ष्म व किती प्रकारे करू शकता, यावर तुमची बुद्धिमत्ता ठरते. मुलांना पाढे येत नाहीत पण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी पक्की. तुमच्या इंचाचे दहा भाग होते. आता शंभर, हजार, लक्ष भाग शक्य असते. ही किमया सूक्ष्म साधन व संकल्पनांची. मूल्य आणि मिळकत यांचे नैतिक सूत्र तुम्ही शिकत मोठे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/९२