पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपले शिक्षण मुक्त होईल तो सुदिन! गृहपाठ, प्रकल्प, आदर्श उत्तरे नवनीत छाप असतात याचे पालकांना व शिक्षकांना, परिक्षकांना वैषम्य वाटत नाही याचे आश्चर्य वाटते! शिक्षकाच्या घरी पाठ्यपुस्तक नसते पण नवनीत हवेच. शाळेच्या ग्रंथालयाची स्थिती वेगळी नसते. मुलाने स्वतंत्र उत्तर लिहिले, दिले तर नापास ठरत असेल तर प्रश्नांची नवी उत्तरे, समस्यांचे नवे उपाय निघतील कसे? शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक मशीनवर भरण्याच्या काळात हजेरी रोलकॉलनी कां? असा आपल्याला प्रश्न का पडत नाही. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर ज्या शाळा येथून पुढच्या काळात सक्षमपणे करणार नाहीत त्या मागेच पडतील. मुख्याध्यापकांनी राऊंड कशाला घ्यायचा? सीसीटीव्ही जर लुगड्याच्या दुकानात लावला जातो तर शाळेत का नाही? शाळेत जे शिकवले जाते ते व्हिडिओ रेकॉर्डिंग का नाही? ते ग्रंथालयात उपलब्ध का नाही ? ग्रंथालयात ई-बुक्स का नाहीत? द्रष्टेपणा असेल, समाजाला भिडण्याची संपर्क क्षमता असेल तर या सर्व सुधारणांसाठी अनुदानाची, परिपत्रकाची, शासन आदेशाची वाट का पाहायची? सर्व संस्थेने करायच्या मानसिकतेतूनही शिक्षकांनी बाहेर पडायला हवे. समाजातील संस्था, संघटना, कारखाने, धनिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी सुसंवाद आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवून राहायला हवा तरच हे शक्य.
 संगणक, इंटरनेट, तंत्रज्ञानाची साक्षरता तुम्हास भौतिक समृद्धी देईल. पण तुमचे जीवन स्वास्थ्य संपन्न व्हायचं तर मूल्य शिक्षण हवेच. नैतिकता, नागरिकशास्त्र, एकात्मता, प्रामाणिकपणा, समूहजीवन, धर्मनिरपेक्षता, जातीअंत, विज्ञाननिष्ठा, स्त्री-पुरुष समानता, लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुता, भ्रष्टाचार विरोध, कर्तव्यदक्षता या गोष्टींचे अध्यापन व संस्कार ही आंतरभारती शिक्षणाची खरी ओळख. तिची फारकत अक्षम्य !

 विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती निर्माण करणे हे आपल्या शाळेतील शिक्षणाचे आगळे वैशिष्ट्य ठरायला हवे. महाराष्ट्रीयांची वृत्ती ही अल्पसंतुष्ट राहण्याची जशी आहे, तशी नोकरी करण्याचीही. तो स्थितीशील आहे, 'ठेविले अनंते तैसेचि रहावे, मनी असू द्यावे समाधान' हा आपला आदर्श असल्याने एका गावातून दुसच्या गावी बदली आपणास संधी न वाटता शिक्षा वाटते. यात आपली संकुचितताच सिद्ध होते. दक्षिणेतील माणूस जगात सर्वत्र दिसतो, सिंधी नोकरी करताना दिसत नाही, गुजराथी माणसांचे उद्योग जगभर, पंजाब्यांची हॉटेल्स, ढाबे प्रत्येक चौकात, सगळ्या नोकरीत मराठी माणूस. त्यामुळेच त्याच्या विकासाची सीमारेषा कर्नाटकही ओलांडत नाही. हे चित्र बदलायचे तर अभ्यासक्रमात उद्योजगता विकास

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८९