पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बदलायला ? मराठी अभिमान गीत गाणे लोकल अस्मितेचा भाग, पण ग्लोबल आव्हान पेलत संधीवर स्वार व्हायचे असेल तर इंग्रजी आलीच पाहिजे.
 नव्या शिक्षणात सर्जनात्मकता, नवरचना, शोध यांना असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व विषय हे क्रियाशील अंगाने शिकवणे ओघाने आलेच. आता जगभर तोंडी शिकवणे, खडू-फळा, चित्रे-तक्ते या ऐवजी संगणक, इंटरनेट, सीडीज्, डीव्हीडीज्, मल्टिमिडीया, स्क्रीन, लॅपटॉप, मोबाईल्स, फिल्मस, क्लिप्स या पलीकडे जाऊन आता थ्री डी क्लास, व्हर्च्युअल क्लास, रोबो टीचर, ऑन लाईन टिचिंग लर्निंग सार्वत्रिक होत आहे, हे लक्षात घेऊन शाळा तंत्र साधनांनी संपन्न केल्याच पाहिजेत. येणारी पिढी उपजत संगणक साक्षर होते आहे, याचे भान ठेवून शिक्षकांनी स्वतः वेळ न दवडता संगणक साक्षर व्हायला हवे. रोजच्या अध्यापनात सीडी, डीव्हीडी, एलसीडी, इंटरनेटचा वापर केला पाहिजे, तर ते शिक्षण सर्जनात्मक, क्रियाशील, रंजक, आकलनक्षम होईल.

 जगात आजची गोष्ट उद्या जुनी होती आहे. इतक्या गतीने जग बदलत असताना आपले अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके दरवर्षी नको का बदलायला? एस्.एस्.सी. बोर्ड तपाने पुस्तके, अभ्यासक्रम बदलते. बालभारतीचीही तीच स्थिती. त्यामुळे आपण मुलांना कालबाह्य शिकवून कालबाह्यच नसतो का करत? नवे शोध, नवे विचार, नवी साधन यांनी मुलं अवगत होतात व शाळेत मात्र अजून रहाट-गाडगे जर आपण शिकवत राहू तर कसे होईल? अवकाश व जमीन जोडत जे देश शिकवत राहात ते विकसित होतात, आकाश दर्शन शिकवत राहणार की अवकाश वेध घेणार यावर तुमची विकास गती ठरणार आहे.
 शिक्षणातील या घोकंपट्टी जगातून केव्हाच हद्दपार झाली आहे. २+४=६ शिकवत ७ का नाही हे पण सांगितलं पाहिजे. ज्या वर्गात शिक्षक कमी बोलतात व विद्यार्थी जास्त विचारतात तिथे स्वतंत्र विचारांची, शोधांची निर्मिती अधिक होत असते. मुले घरी जितके प्रश्न विचारतात तितके शाळेत का नाही विचारत असा प्रश्न ज्या दिवशी शिक्षकास अस्वस्थ करेल, त्या दिवशी विचार विश्लेषण, समीक्षा, आकलन इ. शिक्षण सक्रिय करणाच्या व विद्यार्थ्यांची बुद्धीयुक्त करणाच्या प्रक्रियेचा प्रारंभ होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षकांनी प्रश्न द्यायचे, विचाराचे..... सोडवायचे, उत्तर शोधायचे विद्यार्थ्यांनी. आपल्या शिक्षणात सध्या झेरॉक्सची चलती आहे, नवनीतचे साम्राज्य आहे. या दोन्हीतून

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८८