पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झालं. लेखन, वाचन व गणित विषय स्वातंत्र्यपूर्व काळाच्या निरक्षर समाजास साक्षर करण्यास पुरेसे होते. स्वातंत्र्यानंतर आपण सन १९७५ मध्ये नव शिक्षणाचे धोरण स्वीकारून १०+२+३ आकृतीबंध स्वीकारला. सन १९८६ मध्ये 'शिक्षणाची नवी आव्हाने' या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पुनर्माडणी केली, एकविसाव्या शतकाचा प्रारंभ आपण सर्व शिक्षा अभियान स्वीकारून केला. सन २००९ ला आपण सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षक कायद्यान्वये प्राथमिक शिक्षण इ. १ ली ते ८ वी चे करून माध्यमिक शिक्षण दोन वर्षाचे केले. सध्या महाराष्ट्रात ८+२+२+३ असा नवा आकृतीबंध रुजू लागला आहे. राष्ट्रीय साक्षरता मिशन, सर्व शिक्षा अभियान यशस्वी करून आपण बाराव्या पंचवार्षिक योजनेत आता (२०१३ ते २०१८) 'राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान' राबवू लागलो आहे. हे अभियान दुसरे-तिसरे काही नसून 'युनेस्को' च्या 'Global Education Digest-2012' ची ती अंमलबजावणी आहे. या अहवालातून असे लक्षात आले आहे की जगातील ३२ दशलक्ष मुले परत त्याच वर्गात राहतात म्हणजेच नापास होतात. ३१ दशलक्ष मुले शाळा सोडतात, जी सोडतात ती परत शिक्षणाकडे वळतच नाहीत. अजून शाळेत न जाणाऱ्या मुली जगात आहेत. कमी वयाची मुले पुढच्या इयत्तेत दाखल केल्याने नापास होण्याचे प्रमाण मोठे आहे. जगातल्या १९६ देशांपैकी केवळ ९१ देशातच स्त्री-पुरुष शिक्षण प्रमाण समान आहे. भारत त्यात नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, ही स्थिती बदलून आपणास एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे असेल तर नवी कौशल्ये आत्मसात करणारे शिक्षण असले पाहिजे.
 लेखन, वाचन व गणित ही जगातल्या सर्व देशातील शिक्षणाची किमान आणि समान उद्दिष्टे राहिली आहेत, पण जगात वाढत्या संगणक वापराने लेखन मागे पडते आहे. अक्षर ओळख मौखिक होऊन लेखनाची जागा टंकन (Typing) घेऊ लागले आहे. शिक्षणातील भाषिक माध्यमांतही जगभर क्रांती झाली आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा व जागतिक संपर्काची भाषा झाल्याने जपान, जर्मनी, फ्रान्स, चीनसारखे भाषिक क्षेत्रात स्वभाषेस प्राधान्य देणारे देशही प्राथमिक स्तरापासून इंग्रजी शिकविण्याकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहे. आपल्याकडे मराठी माध्यमांच्या शाळात पालकांचा सेमी इंग्रजीचा आग्रह त्यातूनच आला आहे, आता नवी पिढी सरळ इंग्रजी माध्यमांच्या शाळा पसंत करते आहे. हा बदलता प्रवाह लक्षात घेऊन आपण आपल्या भाषा शिक्षणाचे धोरण व स्वरूप नको का

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८७