पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मदार व्याख्यान पद्धतीवर (Lecture Method) आहे. ती प्रात्यक्षिक, सहभाग, प्रकल्प, सर्वेक्षण, स्वयंअध्यापन, समस्यापूर्ती, संगणकीय, आभासी इ. पद्धतींचा वापर करून सर्जनात्मक, सक्रिय, रंजक करणे शक्य आहे. मूल्यमापन पद्धती जी केवळ प्रश्नोत्तर केंद्री बनून राहिली आहे, तीपण क्षेत्रभेट, संशोधन, प्रबंध लेखन, मुलाखती इत्यादीवर आधारित करणे शक्य आहे. निरंतर मूल्यमापन, अंकांच्या जागी श्रेणी प्राप्ती, ऐकण्याऐवजी आकलन, समीक्षण, रसग्रहण, प्रक्रिया केंद्री अशा सुधारणांतूनही महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय अध्ययन, अध्यापन, मूल्यमापन, संशोधन इ. क्षेत्रे आमूलाग्र बदलणे शक्य आहे. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतील पारंपरिक अभ्यासक्रमांना फाटा देणे आता काळाची गरज बनली आहे. विधी, अभियांत्रिकी, वैद्यक, व्यवस्थापन, तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी शिक्षण नव सुधारणांच्या संदर्भात प्रात्यक्षिक केंद्री करणे आवश्यक आहे. नवा विद्यार्थी संगणक साक्षर, तंत्र कुशल, बहुभाषी, बहुआयामी कौशल्यधारी येतो आहे, याचे भान नवे अभ्यासक्रम बनवणाऱ्यांना अभावाने दिसते. नवा विद्यार्थी लिहिणारा न राहता टंकक होतो आहे, याचे भानही शिक्षकांत दिसत नाही. परिणामी भारतातील अध्ययन अध्यापन दोन्हीही जागतिक पातळीचे होत नाही.

 एकविसाव्या शतकातील शिक्षण वैश्विक होते आहे. उच्च शिक्षण हे माहिती व तंत्रज्ञानाच्या मार्गाने विकसित होत अधिक व्यक्तिकेंद्रित व व्यक्तिविशेषास वाव देणारे, तद्वतच निवडीला वाव देणारे शिवाय बहुपर्यायी बनते आहे. अशा पार्श्वभूमीवर शिक्षकाचे 'एकविषयी तज्ज्ञ' स्वरूप जाऊन ते 'आंतरशाखीय शिक्षक' असे होत आहे. या संदर्भाने शिक्षकाच्या क्षमतांविषयीचे अपेक्षांचे आकाश सतत वर होत आहे, म्हणून नवा उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आपल्या विषयातील तज्ज्ञ तर हवाच पण त्याच आपल्या विषयाशी संबंधित सर्व ज्ञान-विज्ञानांचा आवाका व व्याप्ती माहीत हवी. ज्ञानाचे रसग्रहण महत्त्वाचे राहिले नसून त्याच्या उपयोजनास, वापर-उपयोगास महत्त्व आले आहे. ज्ञान व माहितीपेक्षा समजावण्यास नव्या व्यवस्थेत महत्त्व आहे. तुम्ही विज्ञानाचा संबंध जीवनाशी जोडत ते विकसित कराल तर उपयुक्त. अर्थ, संज्ञा, परिभाषांपेक्षा स्वरूपाचे आकलन तुम्ही विद्यार्थ्यांच्या गळी उतरवता का ते महत्त्वाचे. हे सर्व करताना तुम्ही संगणक साक्षर आहात का ? नव तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात प्रभावीपणे करता का ? तुमची मजल आभासी शिक्षणापर्यंत गेली आहे का ? तर तुम्ही अद्यतन. वेळेचे नियोजन, समूह कार्य, समाज जाणीव यांची मोट

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८३