पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षकाचे अध्यापन कौशल्य विकसित होत असते. या पार्श्वभूमीवर विद्यमान उच्च शिक्षणातील शिक्षकांची पात्रता अपूर्ण तर आहेच, शिवाय ती अध्ययन-अध्यापनाच्या शास्त्रोक्त गृहीतकाशी विसंगतही. आज केवळ नेट/सेट होणारा पदव्युत्तर उमेदवार शिक्षक होतो. नेट/सेट ही परीक्षा विषय ज्ञानाची आहे, तिचा अध्यापनाशी सुतराम संबंध नाही. त्यामुळे आजचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय अध्यापन हे व्यक्तिसापेक्ष व व्यक्तिक्षमताधारित राहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील गेल्या सुमारे सात दशकांच्या काळात यावर अनेकदा विचार झाला. अगदी अलीकडे 'मॉडेल कॉलेज' निर्मिती संबंधी नेमलेल्या त्यागराजन समितीनेही शिक्षक पात्रतेसंबंधी केलेल्या शिफारशीत प्रशिक्षणावर जोर देण्यात आला होता. पण त्यास विरोध करण्यात आल्याने त्या मागे पडल्या. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात उच्च शिक्षणातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या वर्गातील विद्यार्थी हे अनेक अंगाने वैविध्यपूर्ण असतात. विद्यार्थी भाषा, प्रांत, क्षमता, लिंग, परंपरा, संस्कृती, अर्थ अशा दृष्टीने वैविध्यपूर्ण व भिन्नलिंगी / संमिश्र असतो. या पार्श्वभूमीवरही शिक्षकांचे प्रशिक्षित असणे अनिवार्य ठरते. गेल्या सात दशकांत देशातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात मूलभत स्वरूपाचा बदल होऊन ते विद्यार्थीकेंद्रित झाले, तसे उच्च शिक्षणाचे होऊ शकले नाही, उच्च शिक्षणाचे सार्वत्रीकरण न झाल्याने अध्यापनाचे उच्च शिक्षणविषयक तंत्र (Pedagogy) ही विकसित झालेली नाही. शिक्षकांच्या क्षमतांचे मूल्यमापन विषयक निकष हे शिक्षकाच्या व्यक्तिगत ज्ञानविकासाचे निकष होत. उदाहरणार्थ, लेखन, वाचन, संशोधन, भाषण, चर्चा सहभाग, निबंध/प्रबंध लेखन या एपीआय निदर्शकात अध्यापन कुशलतेची कसोटी दिसतच नाही मुळी. त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अध्यापनविषयक प्रशिक्षण अनिवार्य होऊन गेले आहे. उच्च शिक्षणातील अध्यापकनिहाय अध्यापन पद्धतीमुळेही भारतातील शिक्षणात एकसमवायी चित्र दिसत नाही.
 भारतातील आजवरचा उच्च शिक्षण विकास हा अभ्यासक्रम केंद्रित राहिला आहे. तो शिक्षक विकासकेंद्री (Faculty Improvement Programme) होणे गरजेचे आहे, आज संगणक व संपर्क साधन विकासामुळे अध्यापन तंत्र व पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवरपण उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची अध्यापनविषयक पात्रता निश्चित होऊन ती कालसुसंगत अशा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त होणे गरजेचे आहे. आजच्या महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणाची मोठी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/८२