पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 या सर्वांतून माझ्या लक्षात आलेल्या गोष्टीपैकी महत्त्वाची गोष्ट ही की जागतिक माहिती तंत्रज्ञानाची गती आणि आपले शिक्षण यात मोठे अंतर आहे. आपण बदलतो हे खरे असले, तरी विकासाच्या घोडदौडीपुढे आपले बदल कासव गतीचेच ठरतात. (खरं तर गोगलगाईच्या गतीचेच ! अन् जगाची तर गती गुगलची आहे !) जग दरवर्षी अभ्यासक्रम बदलत असताना, आपण आपले अभ्यासक्रम दशकाने बदलतो. विद्यापीठे तीन एक वर्षांनी आपले अभ्यासक्रम बदलतात. पण त्यात मूलभूत बदल होत नाहीत. 'नव्या बाटलीत जुनी दारू' असं त्या बदलाचं रूप असतं. आज तर स्थिती अशी आहे की विद्यार्थी Digital Natives आहेत, तर शिक्षक Digital Migrants. शिक्षक संगणक साक्षर आहेत, परंतु आधुनिक तंत्र साधनांचा वापर करीत नाहीत. खिशातील मोबाईलचा शैक्षणिक साधन म्हणून करण्याची मानसिकता नाही. नव साधन व तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या ऊर्जा व उत्साहाच्या अभावी विद्यार्थी व शिक्षकांतील दरी रुंदावते आहे. आपण कालबाह्य गोष्टी शिकवत वेळ आणि पैसा वाया घालवतो. शिवाय पिढीला जीवनोपयोगी शिक्षण व कौशल्य न दिल्याने बेरोजगार व अकुशल मनुष्यबळाची पैदास आज तेजीत आहे.
 वरील रोगाचे मूळ आपल्या अध्यापक शिक्षणात (Teacher Education) आहे. डी.एड्., बी.एड्., एम.एड्., अभ्यासक्रमविषयक धोरण ठरविणारी राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) आहे, तीच अकार्यक्षम व भ्रष्ट राहिल्याने व तिने जगाचे बदल न स्वीकारल्याने आपल्या शिक्षणाची खरी दुर्गती झाली आहे. न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल स्वीकारून आपण अध्यापक शिक्षणात सुधारणा केल्या असत्या तरी काही एक बदल झाले असते, पण देशातील शिक्षणाचे सूत्रधार (संस्था चालक), राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने सरकार त्यांचे हितसंबंध जपत आले आहे. शासन अनुदानित विद्यापीठे व महाविद्यालये स्वायतत्तेचा फायदा घेऊन कात टाकत आहेत, असे चित्र नाही. उलटपक्षी अन्य खासगी वा विदेशी संस्था वा विद्यापीठांच्या तुलनेत ते मागेच दिसतात. नॅकचा दर्जा भौतिक संपन्नता द्योतक आहे. तो बौद्धिक मूल्यमापन करतो, पण ते मुल्यमापन संरचनात्मक (Framed) आहे. संशोधनाचा दर्जा सुमार असून प्रकाशने तकलादू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले एकही विद्यापीठ नसणे, हा त्याचा पुरावा.