पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

याच काळात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या पदव्युत्तर अध्यापन केंद्रात एम.ए., एम्.फिल., पीएच्.डी. अभ्यासक्रमांसाठी मानद अध्यापक व संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले. सन २००५ ते २०१० या कालखंडात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आमच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राचा प्रमुख होतो, तिथे ही बी.ए., बी.कॉम., शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांचे एम्.फिल्. अभ्यासक्रम आम्ही चालवत होतो. या काळात शिवाजी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विभागातील बाल शिक्षणास मी मार्गदर्शन करत असे. बालवाडी ते पदव्युत्तर अशा सर्वस्तरावरील अध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभवातून शिक्षणविषयक माझे काही एक आकलन तयार झाले आहे. सन १९९० ते २०१६ या कालखंडात मी फ्रान्स, इंग्लंड, इटली, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रिया, स्विट्झर्लंड, लक्झेंबर्ग, व्हॅटिकन, जपान, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँगसारख्या देशांना राष्ट्रीय आदान-प्रदान कार्यक्रम व शिष्टमंडळातून भेटी दिल्या, युरोपला तर मी दीर्घकाळ होतो. या काळातही मी तेथील शिक्षण संस्था, शाळा, विद्यापीठे, प्रशिक्षण केंद्रे यांना भेटी देत तेथील शिक्षण व्यवस्था जवळून अभ्यासली आहे.
 मधल्या काळात निवृत्तीनंतर एका बृहत् संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीने दिलेला सुमारे दहा लक्ष रुपयांच्या अनुदानातून मी ‘हिंदी वेब साहित्य' वर संशोधन केले. महाविद्यालयाचा प्राचार्य असण्याच्या काळात महाविद्यालयाच्या प्रशासनात ई-गव्हर्नन्स यशस्वी केले होते. ग्रंथालयाचे संगणकीकरण, कॉम्प्युटर लॅबसारखे प्रकल्प पूर्ण केले होते. त्या सर्वांतून माहिती तंत्रज्ञानाशी संपर्क व सहवास लाभला होता. या विविध परिदृष्यांतून जागतिक शिक्षणाचे जे माझे आकलन तयार झाले होते, त्या तुलनेत मी सतत भारतीय शिक्षणाची तुलना करत होतो. शिक्षणविषयक विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अहवाल मी वाचत राहिलो आहे, वेगवेगळ्या शिक्षण व शिक्षकविषयक प्रश्न व समस्यांवर इंटरनेटवर उपलब्ध अद्यतन माहिती, लेख, लिंक्स, पीडीएफ्स, पीपीटी, क्लिप्स, इ. वाचत, पाहात नि ऐकत आलो आहे. भाषाविषयक सॉफ्टवेअर्स हाताळली आहेत. शिक्षणविषयक अध्यापन साधने, ब्लॉग्ज, ऍपस् अनुभवत वेबसाईटस् मी पाहिल्या, वाचल्या. विविध विद्यापीठ व संस्थांचे ऑनलाईन अभ्यासक्रम पाहिले.