पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरवणी माझ्या पाहण्यात आली. तिचे शीर्षकच मुळी होते 'नागपूर द न्यू कोटा'. कोटा हे राजस्थानातले एक शहर आहे, सर्व सुपर फास्ट ट्रेन्स तिथे थांबतात, त्या रेल्वे जंक्शन म्हणून नाही तर ते 'एज्युकेशनल जंक्शन' झाले आहे म्हणून. राजधानी, दुरंतोही तिथे थांबतात. बन्सल, मेघे, रिजोनन्स, एमबीडी आदी कोचिंग सेंटर्स तिथे आहेत. राजस्थानात केंद्रीय विद्यापीठ स्थापन झाल्यावर त्याचे केंद्रीय कार्यालय पहिल्यांदा सुरू झाले ते कोटातच, कारण सगळी राजस्थानची गुणी (?), गुणवंत (?) मुले/मुली तिथं टॅप करणे सोपे होते, हा आपल्या प्रचलित शिक्षण व्यवस्थेचा पर्यायी यंत्रणे केलेला पराभवच नव्हे का?
 वरील महानगरांत एक अभ्यासक्रम करत अनेक पूरक अभ्यासक्रम करता येतात हेही एक कारण असते. बी.ए. करत बीबीए, एम.ए. करत नेट, सेट असे पर्याय उपलब्ध असणे हे नगरांत शक्य असते. ती सुविधा गावात नसते, शिवाय शिकत मिळवण्याची संधी हेही कारण असते. अशा अनेक कारणांनी ग्रामीण भागांचा ओढा शहरी शिक्षण केंद्राकडे वाढतो, वाहतो आहे, महानगर संस्कृतीचे सुप्त आकर्षण (मॉल्स, मल्टिप्लेक्स, मल्टिमीडिया, मल्टिमनी असं नवं ‘एम्’ व्हिटॅमिन शहरात मुबलक !) असतेच.
 राज्य महामार्गावरून आपली गाडी राष्ट्रीय महामार्गावर धावू लागली की रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्रात 'नॉलेज सिटीज्' पाहायला मिळतात. या सिटीज आता डोंगर कपारीत, कासेगाव, लिंबसारख्या छोट्या गावातही पाहण्यास मिळतात. ज्या गावात ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नाही करता आली तरी शिक्षण सम्राट 'ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट' मात्र नक्की स्थापू शकतात. तुमचा राजकीय पुरुषार्थ आता तुमच्या कनवटीला किती टेंपररी, कंत्राटी, सीएचबी, शिक्षण सेवक (त्यालाच शिक्षक असेही म्हणतात !) आहेत; म्हणजे हक्काचे सालदार किती आहेत यावर ठरतो. निवडणुका जिंकायला ही हुकमी प्रचारकांची रोजंदारी फौज कामी येते. पालकही आपला पाल्य अशा बहुविध अभ्यासक्रम शिकवणाच्या शिक्षण संकुलात आवर्जून पाठवतात. कारण ती संकुले संगणक, ग्रंथालय, लॅबस्, कँपस इंटरव्ह्यूची सोय, तज्ज्ञ शिक्षक, वाहतूक सुविधा, कँटीन, होस्टेल्स, वायफाय सुविधांनी संपन्न असतात.
 शिक्षणातील भ्रष्टाचार हेही शिक्षणाच्या व्यावसायीकरणाचे प्रमुख कारण आहे. हा भ्रष्टाचार मंत्रालय, सचिवालय, संचालनालय, विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षणाधिकारी, संस्थाचालक असा पाझरत शिक्षकांपर्यंत

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६८