पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येऊन पोहोचला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृतीकारण.... जीवनाचे कोणतेच क्षेत्र शुद्ध न राहिल्याने शिक्षण क्षेत्र नुसते शुद्ध कसे राहणार ? संस्था मिळवायला, अभ्यासक्रम मंजुरीला, प्रवेश क्षमता वाढवायला, शिक्षक पद मंजुरीला, पद/संच मान्यतेला, पदोन्नतीला, पेन्शन मंजुरीला, मेडिकल क्लेम मंजुरी; कशाला नाही पैसे द्यावे लागत ? शासकीय अधिकारी मोक्याच्या (सोयीच्या नव्हे!) जागी नेमणूक व्हावी म्हणून काय नाही करत ? असे मिंधे शिक्षणाधिकारी काय निरीक्षण करणार नि नियंत्रण ठेवणार ? कारण ते नव्या पंचायत राज व्यवस्थेत लोकशाही, विकेंद्रीकरण, सहकार इत्यादी नावावर लोकप्रतिनिधींचे ताबेदार, सालदार बनलेत ! 'ऐक नाही तर जा गडचिरोलीला' असे संवाद आता नित्याचे बनलेत. शिक्षकही बदलीसाठी काय नाही करत ? (हे नुसतं पंचायत राज व्यवस्थेत नाही तर रयत, विवेकानंद, भारती सदृश बहसंस्थात्मक शिक्षण संस्थांतही पाहायला मिळतं !) भ्रष्टाचार नुसता आर्थिक राहिला नाही तर संस्था चालक/पदाधिकाऱ्यांचे लांगूलचालन, वशिला, भेटी देणं, सत्कार, विवाह, व्याख्यानांना हुकमी उपस्थिती लावणे, गौरव लेख लिहिणे यातूनही दिसून येतो. हे शिक्षण व शिक्षकांचे अध:पतनच होय.
 शिक्षणाच्या बाजारीकरणाचे एक कारण नियंत्रक संस्था, यंत्रणा, व्यवस्थेचं निष्क्रियपण ही आहे. बालवाडीपासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत सर्व ठिकाणी नियंत्रक व्यवस्था आहे. शिक्षणसंस्था सुरू करण्याच्या अटी, सुविधा, पात्रता, संख्या, शिक्षक-विद्यार्थी प्रमाण, संरचना इत्यादीचे नियम आहेत. निरीक्षण व नियंत्रण यंत्रणा आहे, मान्यता, संचालन, विस्तार, गुणवत्ता सर्व बाबींसाठी परिपत्रके, स्टॅट्यूटस्, कोडस् आहेत. ड्यूटी चार्ट आहे. वेळापत्रक, कार्यभार, सेवाशर्ती सर्व आहे. त्याबरोबर शिक्षण व्यवस्थेत 'चलता है' संस्कृतीही पक्की रुजली आहे, त्यामुळे विद्यमान शाळांची पटपडताळणी झाली तेव्हा शाळांच्या अपेक्षित दर्जा (Desirable Standard /Minimum Standard) चे पितळ उघडे पडले, तरी शासन कठोर कार्यवाही करत नाही. कारण आपलेच दात, आपलेच ओठ. शिक्षण खाते, विद्यापीठे, मान्यता परिषदा / संस्था (VGC, NCERT, NCTE, MC इत्यादी) सर्वत्र 'तेरी भी चूप, मेरी भी' असाच कारभार चालतो.
व्यावसायीकरणामुळे गुणवत्तेस ग्रहण :
 इंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर एकदा म्हणाले होते की, "Students cannot be effective in tomorrow's world, if they are trained in yesterday's skill." आपल्या विद्यमान शिक्षण विश्वास ते चपखलपणे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६९