पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाऊ तशी ती अल्प वा प्रातिनिधिक होताना दिसते. उच्च शिक्षणात विद्यापीठे पूर्वी स्वायत्त होती, ती अलीकडच्या काळात शासकीय अनुदानावर अवलंबित राहिल्याने व अभ्यासक्रम, संशोधनातही ती पारंपरिक राहिल्याने त्यांचे स्वरूप स्वायत्ततेकडून शासकीतेयकडे वाटचाल करणारे ठरत आहे. याचे प्रमुख कारणही कुलगुरू हे राजकीय पक्षांचे मूक प्रतिनिधी वा भूमिगत समर्थक असल्याने त्यांची सारी धोरणे शासनानुकूल, संस्थाचालक धार्जिणी होताना दिसत आहे. त्याचेही मूळ शोधू लागलो तर राज्यपाल नियुक्त्यांच्या राजकीयकरणात ते सापडते.
व्यावसायीकरणाची कारणमीमांसा
 महाराष्ट्रातील शिक्षणाचे व्यावसायीकरण हे जागतिकीरणापेक्षा राजकीयकरणामुळे अधिक झाले आहे. शिक्षण क्षेत्रात उद्योग संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक शिक्षण संस्था (कंपन्या) यांची वाढती उपस्थिती हा केंद्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे. केंद्रास शिक्षण क्षेत्रात किमान १५% तरतूद करण्याचे वैश्विक उद्दिष्ट जसे साध्य करता आले नाही तसे प्रगत राष्ट्रांप्रमाणे उच्च शिक्षणात १५% प्रवेशाचे लक्ष्यही गाठता आले नाही. यामागेही नियोजन अभाव, धोरणात असातत्य (धरसोड) ही कारणे आहेतच.
 शिक्षणाचे नागरी केंद्रीकरण (Urban Centralization) हे व्यावसायीकरणाचे एक प्रमुख कारण आहे. एके काळी खेड्यांचा शहरांकडे असलेला ओढा हा नोकरी, रोजगार, उद्योग, सुविधा, मनोरंजन केंद्र म्हणून होता. आता त्याची जागा शिक्षणाने घेतली आहे. गावची मुले तालुक्याला, तालुक्याची मुले जिल्ह्याला हे प्राथमिक, माध्यमिक शिक्षणापर्यंत चालते. अधिक ताणले गेले तर उच्च माध्यमिक शिक्षण जिल्हा केंद्रात घेणे विद्यार्थी व पालक पसंत करतात. पण महाविद्यालयीन वा विद्यापीठीय शिक्षणाच्या ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू झाला की 'पाऊले चालती पंढरीची वाट' या तालावर लातूर पॅटर्न, नागपूर पॅटर्न, पुणे पॅटर्नकडे लोक वळतात. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरे तिथे विद्यापीठे आहेत म्हणून 'एज्युकेशन हब' होत नाहीत, तर तिथे कोचिंग क्लासेस आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळते, कँपस इंटरव्ह्यू होतात, पूरक शैक्षणिक पात्रता संपादन केंद्रे आहेत (कॅट, गेट, जी-मॅट, जीआरई, जेईई, टोफेल, सीईटी, नीट, एसएसबी, एन्ट्रन्स (स्पर्धा परीक्षा), आत्मा इत्यादी) म्हणून. या प्रवेश परीक्षाही एक प्रकारची शिक्षणास व्यवसाय करणारी एक नवी प्रक्रिया व कारण बनते आहे. काहीच दिवसांपूर्वी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र टाइम्सची एक शैक्षणिक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६७