पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानांकन
 शैक्षणिक संस्थांच्या मानांकनाबाबत जागतिक एकमान्यता नसली, तरी 'टाइम्स', थॉमसन रिचर्सची परिमाणे प्रमाण मानली जातात. त्या निकषांत सांख्यिकी माहिती, नोंदणीत (प्रवेश) नित्यवाढ, अभ्यासक्रमांची प्रसंगोचितता, समकालिकता, विद्यार्थी गरज, सुविधा, नावीन्य, संरचना, मूल्यमापन या निकषांच्या संदर्भात जगाच्या आपण फार मागे आहोत हे मात्र खरे.
संकीर्ण
 या शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जा ठरवताना संशोधन फलनिष्पत्तीस (Output)-१८%, पदवीधारक प्रमाण (निकाल)-१४%, देणगी (जनसहभाग)-१४%, नोंदणी (प्रवेश) प्रमाणे-९%, शिक्षक प्रतिष्ठा/परंपरा-९% यांना इतके महत्त्व (Weightage) दिले जाते.
 वरील सर्व निकषांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ नित्य उच्च आंतरराष्ट्रीय मानांकन का मिळवत आले आहे, याचा विचार करता असे दिसून येते की ते विद्यापीठ आपल्या अधिविभागात (School/ Department) मध्ये शिक्षक नेमताना त्या विषयातला जगातला श्रेष्ठ शिक्षक निवडते. विद्यापीठात इतके विषय, अभ्यासक्रम असतात की विद्यार्थ्यास आपल्या आवड, कल, वृत्तीनुसार शिक्षण निवडीचे स्वातंत्र्य मिळते, शिवाय ते विद्यापीठ विद्यार्थ्यांना काय पाहिजे (Want) पेक्षा काय देणे गरजेचे (Need) याचा निरंतर विचार करून अभ्यासक्रम ठरवते. विद्यापीठातील शैक्षणिक सुविधा, वातावरण हे विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास, निसर्ग, सौंदर्य, मनोरंजन, संशोधन, निवास, भोजन इ. सुविधा केंद्री असते. विद्यार्थी नेतृत्व गुणास वाव असतो. ग्रंथालय, प्रयोगशाळा, साधने इत्यादी सतत अत्याधुनिक असण्यावर, कटाक्ष असतो. धर्म, प्रांत, लिंग, संस्कृती, वंश यांचा विचार न करता दिल्या गेलेल्या प्रवेशामुळे सर्व देशातील श्रेष्ठ विद्यार्थी इथे प्रवेश घेतात. प्रवेशित विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होताच जगातील श्रेष्ठ स्थानांवर नियुक्ती होते. 'निवडक निवड' तत्त्व सर्वच स्तरावर पाळल्यामुळे या विद्यापीठाचे ४६ विद्यार्थी नोबेलधारक तर ४९ पुलित्झरधारक होतात. जगातील सर्वाधिक पेटंट सर्वश्रेष्ठ संशोधन होते ते याच विद्यापीठातून.
 आपली पारंपरिक व शासकीय विद्यापीठे असोत वा नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वा देशात नव्याने सुरू झालेली केंद्रीय विद्यापीठे असोत, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची ठरायची तर विद्यार्थी, शिक्षक, संशोधन, अभ्यासक्रम,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५१