पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा सृष्टीचा नियम आहे. भारतातले आर्थिक वास्तव विषम आहे. अजून बिन फळ्याची, झाडाखाली भरणारी शाळा मी 'पॅलेस ऑन द व्हील, दुरंतो, राजधानीने' प्रवास करताना रेल्वेच्या आजूबाजूला पाहतो, तेव्हा लक्षात येते अंतर केवढे मोठे आहे. निजामुद्दीन व नवी दिल्लीतही किती फरक आहे?
 भारतातले बालशिक्षण अजून रामभरोसे आहे. सक्तीच्या व मोफत शिक्षण कायद्याच्या परीघात ते नाही. ज्या देशाचे बालशिक्षण उपेक्षित त्या देशाचं भविष्य अनाथ असतं हे का मला माहीत नाही? पण बंद दरवाजे शिक्षकच किलकिले करू शकतात यावर माझा विश्वास आहे. यंत्रणेचे दरवाजे बुलंद असतात खरे पण दरवाजातली फट ज्यांना माहीत असेल तेच प्रतिकूलतेच्या लक्ष्मण रेषा, लांघू, ओलांडू शकतात हे मी अनुभवले आहे. शिक्षकात जिद्द हवी, बदलण्याची ऊर्मी हवी. नव्याचा ध्यास ज्यांना असतो तेच नवे ग्रह, तारे, शोधतात. मी निवृत्त होताना एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. तसा मी डिजिटल इमिग्रंटच ना? ठरवले की, इंटरनेटवर प्रकाशित साहित्य व भाषेचा अभ्यास करायचा. मी एकही पुस्तक हाती न घेता केवळ संगणकाच्या पडद्यावर वाचून संगणकावरच लिहिले, आधी इंटरनेटवरच. तो संशोधन प्रबंधही प्रकाशित झाला नि मग त्याचे पुस्तक झाले. ते हिंदीतले अशा प्रकारचे जगातले पहिले पुस्तक, संशोधन ठरले. तुम्ही जग बदलू शकता. त्याची एक शर्त असते. त्याआधी तुम्ही बदलायला हवे. जग मागे येते. तुम्ही मात्र पुढे जायला हवे, पुढे व्हायला हवे.

•••

संदर्भ :-

 1. www.teindia.nic.in
 2. blogs.edweek.org
 3. www.educationteaching.com

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५१