पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गरज आहे. आजवर शिकवणे म्हणजे शिक्षकांनी प्रश्न विचारायचे व विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायची म्हणजे शिक्षण असे समीकरण दृढ होते. आता नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासपूर्तीस असाधारण महत्त्व येणार असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकाला किंवा शिक्षकावर प्रश्नांचा भडिमार करणे अपेक्षित आहे. चांगला शिक्षक कोण तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात प्रोत्साहन, संधी देणारा. 'हाताची घडी तोंडावर बोट' जाऊन 'थुई थुई अंगणात नाच माझ्या मोरा' असा फेर वर्गात धरला जाईल तर तो वर्ग चैतन्यदायी शिक्षणाचा नि शिक्षकाचाही!
 शिक्षकांनी ज्ञान देण्यापेक्षा ज्ञान संपादण्याच कौशल्य विद्यार्थ्यात निर्माण करण अपेक्षित राहणार आहे. नवा शिक्षक शिकणारा हवा. (Teacher must be learner first, Teacher second) विल रिचर्डसन नावाचा एक शिक्षण तंत्रज्ञ आहे. त्याचं म्हणणे आहे की, वर्गातून आता 'शिवाजी म्हणतो... चा खेळ' बंद व्हायला हवा. (लहानपणी एक खेळ खेळायचो, त्यात 'शिवाजी' शब्द आला तरच आज्ञा पाळणे अपेक्षित असायचे!) त्याला रिचर्डसननी (Makers Movement) म्हटले आहे. वर्ग म्हणजे आज्ञा, शिक्षक म्हणजे आदेशक, विद्यार्थी म्हणजे आज्ञाधारक. असे (One way) शिक्षण नाही.... 'वारे सर्व दिशांनी दूर' असे मुक्त शिक्षण (Open Ended Education) येऊ पाहत आहे हे शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी शिक्षक उदार हवा. तो तंत्रकुशल (Techno Savvy) हवा. विद्यार्थ्यांना उपकरणे वापरण्यास, तयार करण्यासाठी प्रोत्साहन देणारा शिक्षक, स्वतः विश्व नागरिक बनू इच्छिणारा व विद्यार्थ्यांना विश्वसंचारी बनवणारा शिक्षक हवा. शोधक वृत्ती, विद्यार्थ्यांत निर्माण करणारा शिक्षक हवा. जात, धर्म, भाषा, वंश, प्रांताच्या एकांगी अस्मितेपेक्षा जात, धर्म, वंश निरपेक्ष जग शिकवणारा शिक्षक हवा.
 असे सारे सांगताना मी भारत विसरलो असे मात्र नाही. मला वाडी, वस्तीवरच्या शाळा माहीत आहेत. गाव, पाड्यावर राहणारे आदिवासी मला माहीत आहेत. कुडात भरणारी शाळा मी पाहिली आहे व तट्ट्यात भरणाऱ्या शाळांत मी शिकवलेपण आहे. घड्याळाचे काटे उलटे नाहीत फिरत. आपल्याला जगाबरोबर बदलावे लागते. 'जे बदलतात तेच टिकतात

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५०