पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाची नवी साधने


 शिकवणे साधनहीन होते म्हणजे त्याला शिकवायला काहीच लागायचे नाही. शिकवणाऱ्या शिक्षकाची आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सारी भिस्त ही त्याच्या स्मरणशक्तीवर होती. मौखिक अध्यापन म्हणजे संथा. रोज लक्षात राहील इतकंच शिकवायचे. बोललेले ऐकणे व ऐकलेले स्मरणात ठेवणं, पाठांतर करणे म्हणजे शिक्षण. त्या शिक्षणाला कोणतीच साधन लागायची नाही.
 मग शिक्षणात लेखन आले, कित्ता आला, वही आली. उतरून काढणे म्हणजे शिक्षण होतं एके काळी. अक्षरज्ञान म्हणजे शिक्षण. मग त्याला अंकज्ञानाची जोड मिळाली. नंतर अनेक ज्ञान-विज्ञानांच्या विस्तार, विकासाबरोबर शिक्षणाचा विकास झाला. पाटी, पेन्सिल, वही, पुस्तक, शाई, दौत करत कंपास आला. शाळेत तक्ते, मॉडेल्स, उपकरणे, साधने आली. समाजशास्त्र, विज्ञान, भाषा, साहित्याचा विस्तार, विकास होत विविध ज्ञानशाखा अवतरल्या. ज्ञान विभाजन झाले. नुसत्या समाजशास्त्रातून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादीचा विकास झाला. विज्ञानाचे किती प्रकार आले. साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, लिपीविज्ञान, शैली विज्ञान, अनुवाद विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जीवशास्त्र, संख्याशास्त्र, गणितशास्त्र, अणुविज्ञान, प्राणिशास्त्र, मानववंशशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, संरक्षणशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलविज्ञान, अवकाश शास्त्र यातून प्रचंड साधने विकसित झाली व शिक्षणही समांतरपणे साधनसंपन्न होत गेले.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५२