पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माहीत नाहीत असे नाही, पण जे शक्य आहे, त्याबद्दल आपण का नाही पर्याय निवडायचे ? त्याला तर पैसे पडत नाहीत ?
 मी शिकत असतानाच्या काळात मला वाचलेली दोन पुस्तके, धडे, निबंध आठवतात. निबंधाच्या पुस्तकाचं नाव होतं 'शिवशंभू का चिठ्ठा'. लेखक बालमुकुंद गुप्त. निबंधाचे पुस्तक हिंदी होते, दुसरी होती कथा. मराठी. नाव 'बापाची पेंड' लेखक द. मा. मिरासदार. दोन्हीत कल्पनेची भरारी होती. Fantasy. माणसाचे जीवन वास्तव व कल्पनेचे (Fact and Fantasy) सुंदर मिश्रण असते. वर्तमान शिक्षण Factasy झाले आहे, आभास व भौतिकतेचा सुंदर मिलाफ ! जगाचा क्रम भौतिकाकडून आभासाकडे (Virtual) जाण्याचा आहे. शिक्षण विकासात आपणास याचे भान हवे. ते असेल तरच उद्याच्या शिक्षणाचं आकाश नि अवकाश आपण कवेत घेऊ शकू.
 आई सरोगेट. बाबा हायर्ड, आई-बाबांचं कुटुंब जाऊन दोन आयांचं किंवा दोन बाबांचं कुटुंब असू शकेल. मुलं जन्माला घालायची असा अट्टाहास संपेल. क्लोन बेबी, टेस्ट ट्यूब बेबी शक्य आहे, मुले सोबोर्ग असतील, शिक्षक रोबोट होतील, शाळा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म झालेला असेल. देश कल्पना जाऊन वर्ल्ड, युनिव्हर्स अस्तित्वात येईल. पासपोर्ट, व्हिसा इतिहासजमा होऊन विश्व नागरिकत्व आलेले असेल, अशा काळात तुम्ही कोणत्याही भाषेचे असा. तुम्हाला कोणत्या भाषेचा आऊटपुट हवा आहे, ते बटन क्लिक करा. परिवर्तीत भाषा, भाषांतर, लिप्यंतर, या गोष्टी ऍप्लिकेशन होतील, अशा स्वप्नवत काळाकडे आपण जात आहोत. डायलिंग, केबल, वाय-फाय जाऊन सॅटेलाईट मोड, फोनकडे आपण जात आहोत. या काळात गती शून्य होते आहे. स्थान गैरलागू ठरते आहे, तुम्ही ऑनलाइन आहात का ? तुम्ही 'कनेक्ट' आहात का हे महत्त्वाचे होण्याच्या काळातले शिक्षणही 'कनेक्ट' असण्यावर अवलंबून असणार आहे. अशा काळात भारतातील शिक्षक बदल, परिवर्तनाशी कनेक्ट आहे का हे महत्त्वाचे. साधन समृद्धी नसेल, साध्य जागरूकता आहे का ते महत्त्वाचे. ज्या देशातले शिक्षक जागे असतात, तो देश जागा. परवा जैन एरिगेशनचे डॉ. भंवरलाल जैन भेटले. वय वर्षे ८२. रात्रीची झोप कमी झाली ते बरे झाले म्हणाले. आता मी रात्री युरोपचे काम करतो, दिवसा आशिया खंडातले. जी माणसे वास्तव स्वीकारतात, तीच भविष्य निर्माण करतात. तंत्रज्ञान म्हणून तर श्रेष्ठ व अनिवार्य !

•••

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०९