पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गाडी-घोडे कमी करून हे शक्य नाही का? 'मुले प्रथम' हे तत्त्व मनीमानसी आपण बिंबवले तर मग 'शिक्षण हक्क' कळणार ना? एकदा तुम्ही डिजिटल, थ्रीडी बालवाडीचा आग्रह धरा. पुढील शिक्षण आपोआप नव्या शतकात जाईल.
 भारतातल्या प्रत्येक शिक्षकाकडे (किमान अधिकांश) मोबाइल्स आहेत. प्रत्येक घरात (अधिकांश!) मोबाईल्स आहेत. ते जरी एकमेकांना जोडण्याची दृष्टी शिक्षक-पालक-शाळांनी मिळून विकसित केली तर खालील श्रम, वेळ, पैसा, वाचेल. १) सुट्टीची सूचना २) गृहपाठ देणे ३) प्रगती कळवणे ४) परीक्षा सूचना ५) अभ्यासक्रम ६) शिक्षक रजा ७) शाळेत होणारे कार्यक्रम ८) पालक सभा, सूचना हे सर्व एसएमएस व्हॉटस्ऍपद्वारे सहज शक्य नाही का?
 अजून आपल्याकडे पाठ्यपुस्तके, वह्या, पेपर्स, तपासणी, परीक्षा वेळापत्रक यात किती अपव्यय होतो आहे. पाठ्यपुस्तकांची जागा ई-बुक्सनी भरून काढणे शक्य आहे. सुरुवातीस कागदी पुस्तकांना सॉफ्ट कॉपी, सीडी पर्याय देणे शक्य आहे. ते स्वस्तही पडेल. गृहपाठ वह्यांऐवजी 'ऑन लाईन परीक्षा, गुणतक्ते, प्रमाणपत्रे' वितरीत करणे शक्य आहे. जगात तर मुक्त दूरसंचारी सार्वत्रिक शिक्षण (Massive Open Online Courses) (MOOCS) सुरू झालेत. तिथे तर 'End of Schools' ची भाषा सुरू झाली आहे, शिक्षकाला 'सुविधासाधक' (Facilitator) म्हणायला लागले आहेत. शिक्षकाचे काम 'Talk and Chalk' इतिहासजमा होऊन 'Plug and Chug' झाले आहे. 'बोला नि लिहा' चा काळ जाऊन 'जोडा आणि ओढा' चा जमाना आला आहे.
 घरी जर पुस्तकांची जागा सीडी, डीव्हीडी, पेन ड्राईव्हनी घेतली आहे, तर शाळा, कॉलेजात अजून कागदी पुस्तकांची (तीही कालबाह्य झालेल्या!) खरेदी का करायची असा प्रश्न शिक्षण मंत्री, कुलगुरू, प्राचार्य, मुख्याध्यापकांना का पडत नाही ? ई-जर्नल, ई-बुक्स, ई-खरेदी का होत नाही ? अलीकडे प्रवासात मी 'नॉलेज सिटी, एज्युकेशनल कॉम्प्लेक्स' असे बोर्ड पाहतो नि कोट्यवधी रुपये खर्चून काँक्रीटची जंगले उभारताना मी पाहतो अन् लक्षात येते की अरे पाहता पाहता हे ओस पडणार आहे. शिक्षण मोठ्या प्रमाणात व्यक्तिकेंद्री आवड नि निवडीकडे सरकत आहे. सगळ्यांना एक अभ्यासक्रम जाऊन प्रत्येकाचा वेगळा अभ्यासक्रम होतो आहे. मी माहीत असून 'सिम्युलेशन लर्निंग', 'ब्लेंडेड एज्युकेशन' वर बोलत नाही. 'व्हर्च्युअल म्युझियम', ‘यु-ट्यूब चॅनल', 'गुगल स्ट्रीट' मला

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०८