पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९) भाषा, कला, संस्कृती, संगीत, क्रीडा, जीवन कौशल्ये, तंत्रज्ञान सर्व तऱ्हेच्या परंपरेसह आधुनिकता स्पर्शण्याची विद्यापीठाची विकास शैली हेच तिचे खरे बलस्थान म्हणावे लागेल.
१०) हार्वर्ड विद्यापीठाची पारंपरिक गुणवत्तेची प्रतिष्ठा विद्यार्थ्यास जगातल्या सर्वोत्तम संधी (वेतन, पद, प्रतिष्ठा) मिळवून देते. हार्वर्ड विद्यार्थी हीच त्याची ओळख व शक्ती.
 शाश्वत गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने आपण एकविसाव्या शतकातील बदलत्या शिक्षणाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आपणास असे दिसून येते की शिक्षण प्रचलित शिक्षणास छेद देणारे आहे. ते शिक्षणविषयक पूर्व संकल्पना मोडीत काढते. ते अत्यंत लवचीकपण आहे, कारण ते प्रत्येक वेळेस बदलाला काळाच्या, विशेषतः समकालाच्या कठोर कसोटीवर स्वत:ला पारखण्याचा प्रयत्न करते त्याबरोबर ते असे पाहते की वर्तमान शिक्षण प्रक्रिया एकाच वेळी सर्जनात्मक असेल व दुसरीकडे ती विद्यार्थ्यांचा शिकण्यातील आनंद, रस वाढावा म्हणून रंजक, सुबोधही असेल. वर्तमान शिक्षणाच्या या साऱ्या आशा, आकांक्षांची पूर्तता करताना त्याचे आव्हानात्मक होणे, शिवाय व्यामिश्र (Complex) बनणे, स्वाभाविकच म्हणावे लागेल. यातून ते सुलभ होते आहे, ते तंत्रज्ञानाच्या नित्य नव्या संसाधनांतून.
 तंत्रज्ञान विकासामुळे अगणित शक्यता माणसास खुणावत आहेत. जागतिकीकरणामुळे एकात्मक विकासाचे क्षितिज दृष्टिपथात येऊ लागले आहे, ऊर्जाचे नवनवे प्रकार माणूस शोधून काढत आहे. खनिजे संपत येत असताना सौर ऊर्जेचा पर्याय माणसाने शोधून काढला अन् पेट्रोल संपले तर जग थांबेल या कल्पनेस पूर्णविराम मिळाला. आरोग्य, औषध, वैद्यकीय साधन विकासातून माणूस 'मृत्युंजय' होतो की काय असे वाटू लागले आहे. कारण दरवर्षी जागतिक सरासरी आयुर्मान वाढते आहे. पर्यावरण विध्वंसास पर्याय म्हणून 'हिरवे जग' माणूस साकारू लागला आहे. संपर्क साधन विकासामुळे जग खेडे बनून गेले. अवकाशातील माणसाच्या चढाईमुळे नवी पृथ्वी माणसाच्या तळहातावर येईल हे निश्चित. प्रश्न आज का उद्या इतकेच! तीच गोष्ट समुद्र तळाची. तिथे माणूस प्रतिसृष्टी निर्माण करू शकेल हे आता काही स्वप्न नाही. सत्याचा हा शोध म्हणजे नवशिक्षणाची मर्दुमकी. ती साधली केवळ शिक्षणाच्या शाश्वत गुणवत्ता भानामुळे, हे आपणास विसरून चालणार नाही. उद्याचे जग आजच्यापेक्षा समृद्ध असेल, ते सुखी करण्याचे आव्हान आज आपणापुढचा खरा प्रश्न आहे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१००