पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 जगातील विविध देशांकडे विकासाच्या दृष्टीने पाहिले तर तीन प्रकारची राष्ट्रे दिसून येतात. १) विकसित २) विकासशील ३) अविकसित. या देशांत विकास व विषमतेची दरी आहे. ती भरून काढणे गुणवत्ताप्रधान शाश्वत शिक्षणापुढचे खरे आव्हान आहे. वर्तमान शिक्षणाच्या या स्थितीचा विस्तृत अभ्यास टोनी बॅग्नर यांनी आपल्या 'The Global Achievement Gap' या ग्रंथात केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार नवी पिढी हे माहिती व तंत्रज्ञान युगाचे अपत्य (Ikid) असल्याने गणुवत्तेच्या दृष्टीने या पिढीत काही नव्या कौशल्यांचा विकास करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य होणार आहे. त्यांनी सांगितलेली कौशल्य पुढीलप्रमाणे होत.
 १) चिकित्सक विचार करण्याची क्षमता.
 २) प्रश्न / संकटे सोडविण्याची शक्ती.
 ३) अंतर्जालीय क्षेत्र विकास (Network) संबंधी समायोजन (Adjustment)
 ४) प्रभावक्षम नेतृत्व
 ५) तत्पर समायोजन कौशल्य (Agility)
 ६)नव तंत्र व कौशल्य ग्रहण क्षमता (Adaptability)
 ७) उद्योजकतेत पुढाकार
 ८) मौखिक व लिखित संपर्क, संवाद कौशल्य
 ९) माहिती संपादन व विश्लेषण कौशल्य
 १०) जिज्ञासा व कल्पनाविहाराची ओढ.
 या कौशल्यांच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय शिक्षण प्रक्रिया व व्यवस्थेचा विचार करू लागतो तेव्हा लक्षात येते की, आपण किती कालबाह्य शिक्षण देत बसलेलो आहोत. ज्या शिक्षणात काळाचे आव्हान पेलण्याची व प्रश्न सोडविण्याची क्षमता नसते, ते शिक्षण कुचकामी खरेच. त्यासाठी वर्तमानाचे भान असणारे शिक्षण आशय, विषय, पद्धती सर्वच दृष्टीने ते समकालिक व्हायचे तर जागतिक पातळीवर होणारे बदल आपण सतत टिपण, निरीक्षण करत बदलत राहायला हवे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके जगात दरवर्षी बदलत असताना आपण दशकभर एकच शिकवत राहणे म्हणजे काळाच्या मागेच राहणे नाही का ?
 त्यासाठी वर्तमान शिक्षणात खालील बदल करणे म्हणजे आपले शिक्षण गुणवत्ताप्रधान शाश्वत विकासाचे साधन बनवणे ठरेल.
 १) शाळा, वर्ग पर्यावरणानुकूल बनवणे.
 २) शाळेचे वेळापत्रक वेळ केंद्रित न करता ते परिणामकेंद्री बनवणे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०१