पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही. जाणून, बुजून आपण शिक्षक झालो आहोत. येशू ख्रिस्त पापी माणसांना क्षमा करायचा. कारण त्यांचा असा समज होता की पाप अज्ञानातून घडले आहे, त्यामुळे क्षम्य आहे. आपला व्यवसाय अक्षम्य आहे. पापास त्यात वाव, स्थान नाही, याची आपण एकदा का खूणगाठ बांधून घेतली की मग आपले काम, भूमिका सोपी, स्वच्छ, पारदर्शी झाली समजायची.
 भारतासारखा गरीब देश आपणा शिक्षकांना किती मोठा पगार देतो (विना अनुदान शिक्षक अपवाद). का तर आपण पिढी घडवतो. आपले काम शिकवायचे, ज्ञानसंपादन, शिकवायचे तसेच जीवन कसे जगावे हे शिकवणेही आपलेच काम आहे. पहिल्या इतकेच दुसरे कामही महत्त्वाचे. आपण अर्धेच काम करतो. म्हणजे फक्त अभ्यास शिकवतो. जीवन अभ्यास देत नाही. शिक्षकाची टोलवाटोलवी अक्षम्य अपराध आहे. आपला पगार जनतेच्या करातून येतो. गरीबपण कर भरतात. आयकराशिवाय अनेक कर असतात. गरीब जनता, शेतकऱ्यांना आपला अपराध कळेल तर ते क्षमा नाही करणार आपणाला. दगड, गोटे मारले तरी ते आपण सहन करायला हवेत. आपला सर्वात मोठा अपराध आपण विद्यार्थ्यांशी करत असलेली प्रतारणा होय. आपण इथे शिबिरात वेगळे शिक्षक व्हायचे या ऊर्जेनी आलोत. आपला आत्मस्वर संवेदी हवा. मी शिक्षक, प्राध्यापक होतो. पूर्णवेळ शिक्षक होतो. प्रारंभी पिंपळगावलापण आणि नंतर कॉलेजचा प्राध्यापक, प्राचार्य झालो, तेव्हापण. शाळा, कॉलेज वेळेव्यतिरिक्त अधिकच शिकवायचो. अभ्यासिका,शिबिरे, प्रदर्शने, सहली, सर्व मन:पूत करायचो. शिवाय उर्वरित वेळात सामाजिक कार्य करायचो. शिक्षक संघटना, वंचित विकास, व्याख्याने, लेखन, ग्रंथोत्सव, सांस्कृतिक मेळावे, स्नेहसंमेलने, शिबिरे, कार्यशाळा, परिसंवाद काय नाही केले ते विचारा. शिक्षकाचे काम सर्वज्ञ, सर्वंकष, सर्वग्राही असे समग्र असायला हवे ना? मी असा का झालो विचाराल तर त्याचे उत्तर आहे, 'मला चांगले शिक्षक मिळाले.' तुमचे विद्यार्थी चांगले व्हायचे तर आधी तुम्ही चांगले होणे ओघाने आलेच. त्यात सवलत नाही. अपवाद ही होता नये. सर्व शिक्षकांनी चांगलेच असायला हवे. बालवाडीच्या शिक्षिकेपासून ते विद्यापीठांच्या कुलगुरूंपर्यंत सर्वांनी चांगले शिक्षक व्हायलाच हवे.
 शिक्षकाबद्दलची समाज संकल्पना बदलली आहे. 'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम'चा काळ इतिहास जमा झाला आहे. बालकांचे हक्क, शिक्षण हक्क, मानव हक्क अशा काळात विद्यार्थ्यांच्या हृदयावर आपली प्रतिमा आचरणाने कोरणारा शिल्पकार ही शिक्षकाची नवी प्रतिमा, पुन्हा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०८