पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण पाहातो की मुलगा सातवी पास झाला की गाव सोडतो. दहावी पास झाला की तालुका सोडतो. पदवीधर झाला की जिल्हा सोडतो. पदव्युत्तर झाला की राज्य सोडतो. पीएच.डी. झाला की राष्ट्र सोडतो. या विस्थापन प्रक्रियेने शिक्षक अस्वस्थ झाला नाही तर जग कसे बदलणार? शिक्षक, साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञच जग बदलतात. सर्वच स्पर्धा परीक्षांच्या मागे गेले. सर्वांनीच 'साहेब' व्हायचं ठरवलं तर देश, दुनिया कशी चालणार ? मला हे माहीत आहे की आज शिक्षक होणं कठीण होऊन गेलंय. शिक्षकांची नोकरी मिळवायला १० लाख, प्राध्यापक व्हायला २५ लाख संस्थेला द्यावे लागत असतील व पैसे हीच 'गुणवत्ता' मानली जात असेल तर त्यासारखे आपल्या व्यवसायाचे दुसरे पतन नाही. हा शासनाचा करंटेपणा आहे. विना अनुदान संस्कृतीचं नवं शैक्षणिक जग, साम्राज्य निर्माण करून शिक्षणसम्राट जन्माला घालणारे, होणारे राजकारणी नाकारण्याचं बळ शिक्षकच निर्माण करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात गावचं मत शिक्षकाच्या हाती होतं. आज परत एकदा ती पत शिक्षकांनी प्रवाहाविरुद्ध पोहुन निर्माण केली पाहिजे. काळ बिकट आहे. काम अवघड आहे. पण अशक्य खचितच नाही. बिनपैशाची नोकरी मिळवायचे साधन म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पाहणारी तरुण पिढी शासकीय सेवेकडे आशाळभूत नजरेने आकर्षित होते, त्यामागे 'सेवाभाव' नसून 'मेवाभाव' आहे, हे अधिक क्लेशकारक समाजचित्र आहे. साधनहीन घरातील मुलं, मुली साधनसंपन्न होतात, पण सेवाभावी होत नाहीत. दलित, वंचित संचित होतात, पण दीन-दुबळ्यांप्रती नातेबांधील राहत नाहीत, याचं शल्य मोठं आहे.
 शिक्षकांच्या आत्मस्वराचं मोठेपण कशात तर त्याच्या प्रलोभनमुक्त जगण्यात त्याचे प्रतिबिंब आहे. रस्त्यावर पडलेला रुपया उचलण्याच्या मोहातून शिक्षक मुक्त हवा. रुपया बघून मन चाळवणार, रिऍक्ट होणार. ते स्वाभाविकच, पण तुम्ही छोट्या प्रलोभनालाही बळी न पडणं, तुमचं हे आपवादपणच तुमचं बलस्थान बनेल तर तुम्ही आदर्श होणार, ते तुम्हीच व्हायला हवं. हा स्वर, ही ऊर्जा येथून घेऊन तुम्ही परताल, कृतिशील राहाल तर खरे शिक्षक व्हाल, तसे व्हावे असे मला वाटते. कार्य संस्कृती, कर्तव्यतत्परता, कर्तव्यपरायणता हे आजच्या आपल्या देशापुढचे खरे आव्हान आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी मुकादम लागणं, शाळेस मुख्याध्यापक असणं म्हणजे पराभवच ना? मुख्याध्यापक म्हणजे बरोबरीतला पहिला माणूस इतकेच त्याचे महत्त्व हवे. मग असे का? आपण बैल, घोडे कां आहोत? आपण ठरवून शिक्षक झालोत. आपणास कुणी शिक्षक केले

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०७