पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकदा तिचे पुनरुज्जीवन घडवून आणण्याचा हा काळ आहे. मला फ्रान्समधील मतिमंदांच्या शाळेतील एक शिक्षिका या प्रसंगी आठवते. एका वर्गात एक शिक्षिका एका मुलीस मांडीवर घेऊन चित्र काढत असताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले होते. एका वर्गात एकच शिक्षक व एकच विद्यार्थी. मी विचारल्यावर कळले की, ती जी विद्यार्थिनी आहे ना, तिची आई नुकतीच वारली आहे. आई वारल्यापासून तिचे शिकणंच बंद झालंय. ती नुसती चित्रं काढते. तेही फक्त आईचंच चित्र! मी शिक्षिकेस विचारले, 'तुम्ही काय प्रयत्न करताहात मग?' त्या म्हणाल्या, 'तिनं माझं चित्र काढावे असा प्रयत्न करते आहे!' मी भारतीय शिक्षक असल्याने संशयाने (खरं तर स्वानुभवाने) म्हटले,'हे कसं शक्य आहे?' बाई अत्यंत शांत, दृढ पण नम्र, स्वरात म्हणाल्या, 'ती आता चोवीस तास माझ्याकडेच असते.' का नाही ती मुलगी 'आई' म्हणून 'बाईंचे' चित्र काढणार? कारण त्या शिक्षिकेस तिचा आत्मस्वर सापडला होता नि तिच्यात न आटणारे मातृत्व पाझरत होते. शिक्षिका ते मुख्याध्यापकांनी नेमून दिलेले काम नव्हती करत. ते तिने स्वीकारलेले सती-साध्वीचे वाण होते, व्रत होते. व्रतातून वृत्ती विकसित होत असते. शिक्षक व्यवसाय नसून वृत्ती, प्रवृत्ती, धर्म, कर्तव्य आहे. ती नोकरी, चाकरी नाही. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी स्वप्ने निर्मिणारा सौदागर नसून स्रष्टा आहे. तो स्वप्न विकत नाही, निर्माण करतो, जन्माला घालतो.
 जगात दोन व्यवसाय समर्पणाचे मानले जातात. एक शिक्षकाचा. तो घडवायचे काम करतो. दुसरा पोलिसाचा. तो समाज बिघडू नये याची काळजी घेतो. ज्या देशात हे दोन्ही कार्य कर्तव्यभावनेने होते, तो देश मोठा होतो. समर्पणातून अचूकता, पूर्णता जन्माला येते. तासिका तत्त्वावरचा शिक्षक, अर्धवेळ शिक्षक या आर्थिक दारिद्र्यातून जन्माला आलेल्या गोष्टी होत्या. आज जर भारत महानतेचे, 'स्मार्ट नेशन'चे स्वप्न पाहात असेल तर शिक्षणावरील तरतूद चढत्या भाजणीचीच असायला हवी. दुर्दैवाने या देशात दोघांनाही 'चॅलेंज' केले जाते. ही या देशाची खरी शोकांतिका आहे, पराभव आहे. आज देशास रोज तयारी करून शिकवणाऱ्या व्यासंगी, प्रयोगशील शिक्षकांची गरज आहे. काही शिक्षक 'तयारीचे' असतात. तयार असल्याने त्यांना कधीच तयारी करायची प्यास असत नाही. ज्यांना वाचन, लेखन, उपक्रम, नवता, संशोधनाची प्यास नाही, अशा शिक्षकांनी व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणे श्रेयस्कर! ते उभयपक्षी फायदेशीर. ना तुम्हाला अपराध बोधाचा पश्चात्ताप, ना विद्यार्थ्यांचे, समाजाचे नुकसान,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०९