पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा


 प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो,
 आज तुम्ही सर्वजण रविवारचा सुट्टीचा दिवस असताना इथे 'शिक्षक नव ऊर्जा शिबिर' होते आहे म्हणून स्वत:हून आला आहात. या शिबिराची मूळ कल्पना राबवणारे तरुण शिक्षणाधिकारी श्री. विश्वास सुतार सदर शिबिर आयोजनार्थ अभिनंदनास पात्र आहेत, तसेच तुम्ही शिक्षकही ! 'थ्री टी' (टिकिट, टिफिन अँड टाइम) ची कल्पना केवळ अनुकरणीय ! शिक्षकांनी स्वत:च्या पैशानी, स्वत:चा डबा घेऊन व सुट्टीचा वेळ सत्कारणी लावायचे ठरवून हे शिबिर योजले आहे. पाटगाव (जि. कोल्हापूर)चा हा निसर्गरम्य परिसर ! शिवाजी महाराज इथे येऊन मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन दक्षिण दिग्विजयाला गेले होते, असे सांगितले जाते. तुम्ही आत्मप्रेरणेने आत्मविजय आणि आत्मविकासार्थ या शिबिरासाठी आला आहात. नवऊर्जा घेऊन आत्मस्वराच्या शोधार्थ तुमचे उद्याचे भविष्य उज्ज्वल होवो, तुमच्यातील शिक्षक निरंतर सजग राहो, अशी प्रार्थना व शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो.
 मला संयोजकांनी सांगितलंय की मी तुमच्याशी 'शिक्षकाचा आत्मस्वर आणि ऊर्जा' या विषयावर हितगुज करावं. अशा शिबिरांची परंपराही आपणाकडे पूर्वापार चालत आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या पुढाकारातून पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संस्थेतर्फ सन १९८० च्या दरम्यान असे एक शिबिर पुण्यामध्ये योजण्यात आले होते. 'कृतिशील शिक्षक शिबिर' असं त्याचं स्वरूप होतं. आत्मस्वर जागा असणारा ऊर्जावान शिक्षक कृतिशीलच असतो. तो अध्ययन, अध्यापन कार्य कर्तव्यभावनेने, सचोटीने तर करतोच करतो.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०३