पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिवाय त्यापलीकडे जाऊन तो स्वत:स सामाजिक उपक्रमांशी जोडत राहून सतत योगदान देत राहतो. अशी पदरमोड शिबिरे, सेवाकार्य योजणे व आपण त्यात सहभागी होणे, हे शिक्षकाच्या समाजबांधील असण्याचेच लक्षण होय. तेव्हा त्या शिबिरास संबोधित करताना डॉ. जे. पी. नाईक म्हणाले होते की, शिक्षक होणे सतीचे वाण आहे. शिक्षकांनी पूर्वीच्या विधवेप्रमाणे बंधनयुक्त आणि आत्मइच्छितेच्या वैषयिक, भौतिक प्रलोभनाला बळी न पडता त्यागी, समर्पित जीवन कंठले पाहिजे. ती समाजाची गरज आहे आणि शिक्षकाकडून समाजाची अपेक्षापण! सन् १९८० सालचे विधान हे, पण आज २०१५ लाही तितकेच समयोचितपणे लागू आहे, गरजेचे आहे, असे मला वाटते.
 शिक्षक होणे हे सतीचे वाण कसे? असे जर तुम्ही मला विचाराल तर मला आठवते की सन १९७०-७१ मध्ये मी शिक्षक झालो. प्राथमिक, माध्यमिक वर्गाना शिकवायचो. इथेच जवळ असलेल्या श्री मौनी विद्यापीठात मी शिक्षक प्रशिक्षण पदविका डी. आर. एस्. (एज्यु.) पूर्ण केली. आमच्या वर्गात त्या वर्षी (१९६७-६८) ८० विद्यार्थी होते. पैकी बहुसंख्य बँक, शासकीय समाजकल्याण, सहकार खात्यात अधिकारी होण्यास उत्सुक. पैकी केवळ १० जणच शिक्षण शाखेकडे आले. त्यापैकी मी एक होतो. मी स्वेच्छा, ठरवून शिक्षक झालो. तुम्हीही तसेच स्वेच्छा शिक्षक झालात. 'शिक्षक' होण्याची एक भूमिका असते. तुम्ही निरंतर अध्ययन करायला हवे. तरच तुमचं अध्यापन निरंतर नूतन, अभिनव होत राहणार. तुम्ही आदर्श आचरणच करायला हवे. तरच तुम्ही समाजासाठी अनुकरणीय उरणार ना? मी शिक्षक व्हायचं ठरवलं तेव्हा समाजात एक धारणा रूढ होती- 'मागून मिळत नाही ना भीक, मग मास्तरकी शिक', काहीच जमत नाही ना, मग मास्तर हो. आपणास असे 'मजबुरी का नाम महात्मा गांधी' शिक्षक नाही व्हायचे. ठरवून चांगले शिक्षक व्हायचे आहे आपणास. समाज भले आपणाकडे कुत्सितपणे पाहो. आपण चांगलेच व्हायचे, राहायचे, जगायचे, शिकवायचे.
 माझे एक शिक्षक होते. प्रा. विठ्ठल बन्ने त्यांचे नाव. गमतीने म्हणायचे, "बसलेली बाईपण शिक्षकाला उठत नाही." या गमतीत ही शिक्षकी पेशाचं एक गांभीर्य भरलेलं होतं. पूर्वी गावचा एक रस्ता हागणदारीचा असायचा. वर्दळ कमी असलेला हा रस्ता खेड्यात हागणदारीसाठी वापरला जायचा. एखादी स्त्री शौचाला बसलेली असायची. पाटील, तलाठी निघाला की उठून उभा राहायची, पण शिक्षक निघाला तर मात्र निवांत शरीरधर्म उरकत बसून राहायची. तिच्या अब्रू, लाजेला पाटील, तलाठ्याचं भय होतं. तिच्या

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०४