पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकासाचे टप्पे व शिक्षक म्हणून त्याचा होणारा नित्य, क्षमता, कौशल्य, तंत्र, आशय समृद्धी, प्रयोग, संशोधन, उपक्रम, मूल्यमापन इत्यादी अंगांनी होणारा नित्य, नूतन विकास या आधारावर प्रवेश ते निवृत्ती अशा सुमारे चार दशकांच्या कालखंडात निरंतर विकासशील शिक्षक आपल्या क्षमतावर्धन वृत्तीच्या जोरावर ठरावीक कालखंडानंतर वरच्या श्रेणी व क्षमतेचा शिक्षक बनतो. तो तसा बनणारा शिक्षक ख़रा ज्ञानसाधक व ज्ञानवर्धक! या आधारे शिक्षकांचे पाच वर्ग मानण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे (१) उमेदवार शिक्षक (प्रशिक्षणार्थी शिक्षक) (२) होतकरू शिक्षक (३) उपक्रमशील शिक्षक (४) निष्णात शिक्षक (५) नामवंत शिक्षक आपल्याकडे अशा सवर्ग विकासाचा चढता आलेख अपवादाने पाहायला मिळतो. कारण शिक्षक म्हणून व्यक्तिमत्त्व आणि वृत्ती विकासाची प्रोत्साहक, निरीक्षक, मान्यता देणारी यंत्रणा आपल्याकडे शालेय स्तरावर नाही. महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवर वार्षिक स्वयंमूल्यमापन (Self Appraisal) गुणवत्तावर्धक निर्देशांक (Academic Performance Index) यांची असलेली तरतूद यामुळे उच्च शिक्षणातील प्राध्यापक हिरिरीने शैक्षणिक पात्रता वाढ, चर्चासत्र सहभाग, लेखन, वाचन, संशोधन, प्रयोग, उपक्रम यातून स्वत:स विकसित करताना दिसतात. त्यांच्यातील ही ऊर्मी शालेय शिक्षकात जोवर येणार नाही, तोवर शिक्षकांचे गुणवत्तावर्धन होणार नाही. शिक्षण प्रभावी व्हायचे तर शिक्षक विकासशील हवा, जगात शिक्षक चैतन्यशील संशोधक व प्रयोगशील सर्जक राहावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न, प्रोत्साहनाच्या अनेक योजना असता भारतातील त्यांचा अभाव येथील शिक्षकांना स्थितीशील बनवतो. हे चित्र बदलायचे असेल तर नित्य विकसनशील शिक्षण यंत्रणा उभारण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. तसे झाले तर आपले शिक्षकही निरंतर विकासशील शिक्षक बनतील.

•••

संदर्भ :-
 Teacher Standard - Missouri Educator Evaluation System. (U.S.)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८६