पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंतर आहे, 'काय' प्रश्नात जिज्ञासा असते. का? प्रश्नात चिकित्सा भाव असतो. शिक्षक विवेकी हवा तर तो बुद्धिप्रामाण्यवादी, नैतिक, विज्ञाननिष्ठ असणार, असा शिक्षक स्वयंप्रज्ञ विद्यार्थी निर्माण करतो. तो पोपटपंचीवर विश्वास न ठेवता मुलांपुढे प्रश्न ठेवून त्यांना विचारप्रवण बनवतो. तो आपले अध्यापन सक्रिय बनवतो, ते विद्यार्थ्यांना सर्जनशील, कृतीशील बनवून. विचार, परिवर्तन ही व्यक्तिमत्त्व विकासाची पूर्वअट असते.
सकारात्मक शैक्षणिक पर्यावरण निर्माता
 व्यक्तिगत जाण, समूह भावनांचा आदर व विकास, प्रेरणापर प्रोत्साहन, सर्जनात्मक अध्यापन, स्वयंशिक्षण पूरक उपक्रम व वर्ग नियोजन, सकारात्मक दृष्टी, या अशा काही बाबी आहेत की, शिक्षक जर याबाबत दक्ष आणि प्रयत्नशील राहील तर शाळेत, वर्गात सकारात्मक शैक्षणिक पर्यावरण निर्माण होऊन ते ठिकाण विद्यार्थ्यांच्या आकर्षण व अभिरुचीचे केंद्र बनेल. अशा शाळा विद्यार्थ्यांसाठी चैतन्याचे मळे व उत्साहाचे कारंजे होत असते. शाळेचा जिवंतपणा हा शिक्षकाच्या सकारात्मक, प्रोत्साहक, प्रेरक वृत्तीवर अवलंबून असतो.
हृदयस्पर्शी संवाद कुशलता
 शिक्षणाची एक शब्दी व्याख्या 'संवाद' आहे. हा संवाद विद्यार्थी व शिक्षक या दोन व्यक्तीमधील असतो तेव्हा ते हितगुज असते, पण शिकणारा व शिकवणारा यांच्यामधील प्रक्रिया म्हणून जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ते संप्रेषणाचे रूप धारण करतं. शिक्षकाला या दोन्हीतील अंतर व मर्यादा यांचे भान हवे. शिक्षकाला जे सांगायचे, शिकवायचे, कळवायचे आहे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे तर शिक्षकाचे अध्यापन संवादी हवे तसेच ते बहुविधही हवे. प्रश्नोत्तर, नाटक, अभिनय, कोडी, विचार, चर्चा, गट कृती इत्यादीतून हा संवाद निर्मितीक्षम, कृतिशील करून सुजाण शिक्षक आपले अध्यापन ज्ञानवाही व ज्ञानवर्धक बनवतो.
वस्तुनिष्ठ मूल्यमापक
 विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे सूक्ष्म निरीक्षणातून पाहणारा वस्तुनिष्ठ शिक्षक मूल्यांकनातून येणारा निष्कर्ष, निर्णयांच्या आधारे शिकवण्यात नित्य, नूतन प्रयोग करत राहतो. त्यामुळे त्याचं रोजचं शिकवणे नवे होते. स्वत:च्या अध्यापनाचा व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा कायाकल्प करणारा शिक्षक नित्यनूतन शिक्षक !
 वरील परिमाणांच्या कसोटीवर निवडल्या गेलेल्या नव्या शिक्षकाचे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८५