पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही सगळी रचना त्या त्या प्राण्यांच्या वंशवृद्धीला अनुकूलच असणार. म्हणजेच गर्भधारणा अन् पिल्लांचे संगोपन या दोन्ही गोष्टी त्यातून साधल्या जात असणार. हरणांची पाडसे प्रथम आईच्या दुधावर आणि नंतर गवत अन् चाऱ्यांवर वाढतात. त्यांच्या पोषणासाठी नराची मदत आवश्यक नसते. हीच गोष्ट माकडे, हत्ती यांच्या- बाबत आहे. याउलट जिथे पिल्लाच्या संगोपनासाठी फार काबाडकष्ट करावे लागतात, एकटी आई पुरी पडत नाही तिथे अशी रचना असेल तर पिल्ले मरून जातील. वंश वाढणार नाही. अशा बाबतीत एक नर, एक मादी अशी व्यवस्था उत्क्रांत झाल्याचे दिसेल. हॉर्नबिल किंवा धनेश हे या प्रकारचे टोकाचे उदाहरण आहे. यात मादी झाडाच्या ढोलीत अंडी घालते आणि उबवण्याकरता तिथेच बसते. नर या ढोलीचे तोंड चिखलाने लिपून टाकतो. मादीची चोच बाहेर येण्यापुरते एक भोक तेवढे ठेव- लेले असते. पिल्लांची पुरेशी वाढ होईपर्यंत त्यांना आणि मादीला नर या भोकातून अन्न पुरवतो. नराच्या मदतीची इतकी गरज असलेल्या पक्ष्यात एक नर अनेक माद्या ही रचना स्थिरावणे शक्य नाही. पक्ष्यांची पिल्ले फार झपाट्याने वाढतात. बरेचदा चार महिन्यात त्यांचा आकार आईबापांएवढा होतो. अनेक पक्ष्यांत दोन आठवडे वयाच्या पिल्लाचे वजन आईबापांच्या ९०% असते. ती पिल्ले आहेत हे रंगावरून किंवा वागण्यावरूनच कळते. पेंटेड स्टोर्क या पक्ष्यांमधे आईबापांच्या अंगावर पांढरा, काळा, पिवळा, भगवा असे अनेक रंग असतात. उलट पिल्ले मात्र अगदी अनाकर्षक करड्या रंगाची. कावळ्यांत तसे नाही. पिल्लांचाही रंग काळाच. पण अगतिकपणे चोच वासून ते आईबापांकडे अन्न मागताना दिसले की, लगेच ओळखू येते. तसेच चोचीच्या आत कोवळेपणाचा भडक लाल रंगपण दिसतो. इतक्या झपाट्याने वाढ- णाच्या पिलांना खायला घालणे हा खटाटोप फारच मोठा असतो. पाकोळीसारख्या पक्ष्याला तर मिनिटा मिनिटाला किडे आणून पिल्लाच्या चोचीत भरवावे लागतात त्यामुळे अपरिहार्यपणे एक नर, एक मादी असे कुटुंब व्हावेच लागते, जो नर अनेक माद्यांबरोबर राहण्याचा प्रयत्न करेल त्याची पिल्ले भुकेने मरतील आणि त्याच्या जीन्स गडप होतील.

 समजा, नराची मदत हवी आहे. पण तो निघून गेला, तर काय ? पिल्लू जगले नाही तर नराचे शुक्रजंतू फुकट गेले. पण त्यांचा पुरवठा भरपूर असतो. तो नर

तुझ्यावाचून करमेना / ६७