पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कसे असतील ? एक नर आणि एक मादी, एक नर आणि अनेक माद्या अन् एक मादी आणि अनेक नर असे पर्याय असू शकतात किंवा अनेक नर अन् अनेक माद्या अशीही टोळीची रचना असू शकते. यांपैकी पहिले दोन पर्याय निसर्गात बरेचदा दिसतात, माकडे, हरणे, एलेफंट सील ही सगळी एक नर अनेक माद्या अशा व्यव- स्थेची उदाहरणे होत. उलट आसाममधील हूलॉक गिबन जातीची माकडे, बदके, साळुंक्या, हॉर्नबिल (किंवा धनेश किंवा शिंगचोच्या ) यांच्यामधे नरमादीच्या जोड्या असतात. वाघ, चित्ते या प्राण्यांमधे विणीच्या हंगामापुरत्या नर-मादी जोडचा बनतात. हंसांची जोडी तर काव्यामधे अमर झाली आहे. सिंहांमधे मात्र अनेक नर, अन् अनेक माद्या असे कुटुंब दिसते.

 काही जातींच्या हरणांच्या कळपामधे अनेक माया, पिल्ले आणि एक रुबाबदार, मोठी शिंगे असलेला, बळकट, ताकदवान नर असा प्रकार दिसतो. या कळपातील पिल्ले मोठी होऊ लागली की, त्यातल्या नरांना हा कळपाचा प्रमुख हुसकावून लावतो. तरुण नरांना वेगळा गट करून राहावे लागते. त्यांचे लक्ष सतत या प्रमुख नरावर असते. तो पुरेसा ताकदवान राहिला नाही असा संशय आला की, ही मंडळी त्याच्या- वर हल्ला करून त्याला पळवून लावतात. राजा बदलतो. काळतोंडघा हनुमान लंगूर माकडांच्या टोळ्यांमधेही हा संघर्ष सतत चालू असतो. पण त्यांच्यात सत्तांतरा - नंतरचा अंक हा भीषण हत्याकांडाचा असतो. टोळीचा नवा राजा टोळीतील सर्व पिल्लांना निर्घृणपणे मारून टाकतो. सिंहांच्या कुटुंबातील नरांना सतत कुटुंबा बाहेरील नरांच्या टोळ्यांचे हल्ले परतवावे लागतात. पण कधीतरी फासे उलटे पडतात. या नरांची जागा बाहेरचे नर घेतात. मग हे नवे कुटुंबप्रमुख पहिल्या नरांपासून झालेल्या पिल्लांना ठार मारतात. कोवळ्या पिल्लांच्या जिवावर उठणारी ही पद्धत उत्क्रांतीत टिकून का राहाते ? तर त्यातून नवीन नरांच्या जीन्सचा जास्त प्रभावीपणे प्रसार होतो. म्हणून. पिल्ले मेल्यानंतर काही काळाने माथा पुन्हा समागमोत्सुक होतात, माजावर येतात. नव्या नरांपासून त्यांना गर्भ राहतात. हत्तींची कहाणी आणखीच वेगळी. हत्तिणी आपल्या टोळ्यांमधे नरांना थारा देत नाहीत. पिल्ले मोठी होऊ लागली की, स्यातल्या नरांना आपला मार्ग शोधावा लागतो. समागमाच्या वेळी एक बलदंड हत्ती टोळीत येतो. माजावर आलेली हत्तीण गाभण झाली की पुन्हा निघून जातो.

६६ / नराचा नारायण