पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बुंधा कोणता हे सहज सांगता येत नाही. इतकी नाटयमय नसली, तरी पुणे विद्या- पीठाच्या मुख्य इमारतीसमोरची वडाची झाडेसुद्धा या दृष्टीने बघण्यासारखी आहेत. प्राण्यांमधे मात्र पुनरुत्पत्तीचा हा प्रकार अपवादात्मकच म्हणावा लागेल. त्यांच्या पुनरुपत्तीचे मूळ आहे लिंगभेदात. पारंपरिक भारतीय कलांमधे शृंगाररसाला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. ते उगाच नव्हे. या रसाचे आकर्षण संपले तर मानवजातच संपून जाईल. अर्थात हा काही संभाव्य धोका नव्हे. नुसता तर्काचा खेळ. मानवजातीच्या उत्क्रांतीमधे स्त्री-पुरुष आकर्षणाचा गोफ इतका घट्ट विणलेला आहे की, सुंभ जळला तरी हा पीळ सुटत नाही. या आकर्षणाला आपण संस्कृती, रूढी यांचे अनेक लगाम लावतो. तरी हा वारू कधी उधळेल याचा नेम सांगता येत नाही. प्रत्येकजण कौमार्यावस्थेपासून पुढे अनेक दशके हा अनुभव सतत घेत असतो.
 जीवशास्त्राला पडलेले अवघड कोडे म्हणजे असा लिंगभेद मुळात निर्माणच का व्हाचा ? नरमादीमधे नेमका फरक आहे तरी कोणता ? माणूस, कुत्रा, हत्ती, घोडा या सर्वांमधे नराचे वैशिष्ट्य म्हणजे लिंग. पण लिंगरूप जननेंद्रिय असेल तरच नर, असे मुळीच नाही. काही प्रकारच्या शिंपले (ऑयस्टर्स) व मासोळ्यांमधे नराला असे लिंग नसते. मादी म्हणजे कोण ? योनिमार्ग आणि स्तन असलेला प्राणी ? पण पक्षी, साप, किडे, मासे यांना कुठे स्तन असतात ? नर आणि मादी हा फरक इतका उघड असून त्याची व्याख्या करणे सोपे नाही. गोगलगायी, गांडुळे यांच्यासारख्या प्राण्यात एकाच शरीरात नर आणि मादी दोघांचे लैंगिक अवयव असतात. एकच जीव आपल्या इच्छे- नुसार नर किंवा मादी म्हणून काम करू शकतो. वनस्पतींमधे बहुतांशी पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकाच फुलात सांपडतात. मेंडेलने प्रयोगाकरता घेतलेल्या घेवड्यांच्या जातीत फुलाच्या पुंकेसरांचा त्याच फुलातील स्त्रीकेसरांशी संयोग होऊन फलधारणा होते. इतर बऱ्याच वनस्पतींमधे एकाच फुलात पुंकेसर अन् स्त्रीकेसर असले, तरी परपरागीकरणाने म्हणजेच एका फुलाचे पुंकेसर दुसऱ्या फुलातील स्त्रीकेसरांवर पडून फलधारणा होते. पपईसारख्या वनस्पतीत तर नर आणि मादी झाडेच वेगवेगळी असतात.

 निसर्गातील या विविधतेत नर आणि मादी यांच्यात काही सार्वत्रिक फरक असेल, तर तो म्हणजे त्यांच्या बीजपेशींचे आकार. मादीची बीजपेशी म्हणजे अंडे, हे बहुधा

६२ / नराचा नारायण