पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण पाचवे

तुझ्यावाचून करमेना

जीवसृष्टीचे एक वैशिष्ट्य म्हणजे पुनरुत्पत्ती. एका जीवापासून अनेकांची निर्मिती. खायला पुरेसे असले, परिस्थिती अनुकूल असली, तर एकपेशीय अमिबाच्या शरीरात नाट्यमय बदल होऊ लागतात. केंद्रभागातली रंगसूत्रे आपली एक जादा प्रत बनवू लागतात. मग मूळची रंगसूत्रे आणि त्यांच्या प्रती यांच्यातून दोन सारखे गट तयार होतात. शेवटी पेशीचेच दोन भाग होतात. ही झाली विभाजनातून पुनरुत्पत्ती. गुलाब, मैदी यांसारख्या रोपांचे तुकडे करून जमिनीत टोचले तर नवीन मुळे फुटून नवीन रोपे तयार होतात. हरळी वाढायला लागली की जमिनीवर पसरते. तिला जागो- जाग मुळे फुटतात. हे सगळे नवे जीव. सुरुवातीच्या रूपाशी त्यांचा सांधा तुटला तरी ते वाढतात. वडाच्या पारंब्या लोंबत खाली येऊन जमिनीला टेकल्या की, त्यांना मुळे फुटतात. कलकत्त्याला बोटॅनिकल गार्डनमधे अगदी मुद्दाम बघण्यासारखा पुरातन वटवृक्ष आहे. त्याच्या अक्षरश: शेकडो पारंब्या जमिनीत घुसल्या आहेत. मूळ वृक्षाचा

तुझ्यावाचून करमेना / ६१