पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तरी लाळ गळू लागते. मटण दिसल्याशिवाय. एकपेशीय प्राणीसुद्धा अनुभवाने शिकतात. हे कसे घडते ? विज्ञानाला हे अजून अज्ञात आहे. बदकाचे पिल्लू अंड्या- तून बाहेर आल्याबरोबर पहिल्या काही तासात आपल्या आईला ओळखू लागते. मग मोठे आणि सुटे होईतोवर ते आईची पाठ सोडत नाही. उत्क्रांतीमधे हा गुणधर्म टिकणे स्वाभाविक आहे. कारण यामुळे पिल्लाला पोषण आणि संरक्षणात मदत होते. पण ही मातेची ओळख होते कशी ? कॉन्राड लोरेन्झ या शास्त्रज्ञाला अर्धशतकापूर्वी शोध लागला की, त्या पिल्लाच्या जीन्समधे योजना आहे, ती अशी की जन्मल्याबरोबर समोर दिसेल त्या मोठ्या हलत्या वस्तूचा पाठपुरावा करणे. त्या वस्तूचा रंग, बांधा, तिच्यातून निघणारा आवाज कशाचा म्हणून संबंध नाही. नवजात बदकासमोर प्रथम माणूस आला, तर ते माणसालाच आई मानल्यासारखे त्याच्या मागे मागे जाते. हलत्या ठोकळ्यामागे सुद्धा जाते. लोरेन्झ स्वतः अनेक बदकांची आई बनला. पण त्याच्या या शोधानंतरच्या अर्धशतकात शास्त्रज्ञांना, बदकाच्या मज्जासंस्थेच्या कोणत्या गुण- धर्मामुळे हे घडते याचा पत्ता लागलेला नाही.

६० / नराचा नारायण