पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यला कसे जमते ? एका शास्त्रज्ञाच्या मते हे काम अगदी सोप्या हुकुमांनी करून घेता येईल. हुकूम एक. प्रत्येक अळीने शरीरातून विशिष्ट रस निर्माण करून तो मातीत मिसळून छोटे गोळे तयार करावेत. प्रत्येक अळीने आपापल्या गोळ्यांची रास करावी. या हुकुमामुळे वस्तीत हजारो राशी निर्माण होऊ लागतील. हुकूम दोन. मधूनच आजूबाजूला पाहा. स्वतःच्या ढिगापेक्षा बराच मोठा ढीग जवळ दिसला तर आपला ढीग सोडून त्या मोठ्या ढिगावर गोळे रचावेत. या हुकुमामुळे काही थोड्या ढिगांची उंची भराभर वाढू लागेल. हुकूम तीन. आजूबाजूला पाहा. उंच ढिगांची एकमेकाच्या अगदी जवळ अशी जोडी दिसली तर आपला ढीग सोडून तिकडे जा. हुकूम चार. दोन उंच ढिगांची टोके जवळ दिसली तर आपल्या चिकट गोळ्यांनी ती जोडून टाका. हे हुकूम पाळले तर वेड्यावाकड्या, कोणताही पद्धतशीर प्लॅन नसलेल्या का होईना, पण कमानी बनतील. वारुळाला हवेशीरपणा येईल. वाळवीला सुखाने आत राहता येईल. आपण संगणकाकडून अशा प्रोग्रॅम्सद्वारे अनेक कामे करून घेतो. इतकी कौशल्याची की संगणक बुद्धिबळात उत्तम खेळाडूंना हरवू शकतात. माणूस कठपुतळीच्या दोन्या हलवणाऱ्या संयोजकासारखा त्यांच्या पाठीशी उभा असतो. प्रोग्रॅम्सच्या स्वरूपात. वाळवी कमानी बांधते ती जीन्सच्या स्वरूपातील प्रोग्रॅम्समुळे. मात्र वाळवीच्या शरीरातील जीन्स नेमक्या कोणत्या मार्गाने तिच्याकडून काम करून घेतात हे अजून माणसाने जाणलेले नाही. मज्जासंस्था आणि मेंदू यांच्याबाबतचे माणसाचे ज्ञान तुलनेने अजून फार प्राथमिक स्वरूपात आहे.

 प्राणी शिकतात कसे, हे अजून न उलगडलेले कोडे आहे. बेडकाची मादी आपल्या जातीच्या नराचा आवाज ओळखून बरोबर त्याच्याकडे जाते. दुसऱ्या जातीच्या बेडकाचा आवाज तिला फसवू शकत नाही. याचे रहस्य काय ? एका प्रयोगातून असे लक्षात आले आहे की, त्या मादीच्या ध्वनिसंवेदन जाणणाऱ्या, मज्जापेशींवर विशिष्ट ध्वनिलहरी ( अमुक इतक्या मेगॅहर्टस ) पडल्या तरच त्या पेशी उत्तेजित होतात आणि नर नेमक्या तशाच ध्वनिलहरी सोडतो. म्हणजेच जीन्सनी या मज्जा- पेशींच्या रचनेवर परिणाम केला आहे. पण असा उलगडा झालेल्या बाबी फार कचित्. पाव्हलोव्हच्या प्रयोगात कुत्र्याला मटणाचा तुकडा दाखवला की त्याची लाळ गळते. पण रोज तोच माणूस मटण आणून घालत असेल, तर पुढे नुसता तो माणूस दिसला

अनुरूपता / ५९