पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(जीव ) एकदा घडले की मग त्याचे भवितव्य परिस्थिती ठरवते. नियोजन काय ते आधी. नंतर फक्त या योजनेप्रमाणे वाटचाल, कधी वाढ तर कधी नाश. एका विशिष्ट परिस्थितीला अनुरूप अशी रचना केली आणि परिस्थिती बदलली तर यंत्र पाण्यात. आणि बरोबर त्याच्या निर्मात्या जीन्स. त्याऐवजी हवे तर यंत्रात लवचिकपणा ठेवा. समजा, एका यंत्रात रचना अशी की भोवतालचे अन्न खात राहायचे. पुरेसे जमले की, पुनरुत्पत्ती करायची. बरेच एकपेशीय प्राणी असे असतात. पण मग या यंत्रांनाच खाणारी यंत्रे आली तर पंचाइत ! ठीक आहे. मग पर्यायी योजना बनवा ( म्हणजे योगायोगाने, गुणबदलाने नवी जीन घडली असे माना. ) नव्या योजनेत एकच बदल. तो म्हणजे ' हालचाल जाणवली की तिच्यापासून दूर पळून जा.' " याला किंमत पडते. अन्न गोळा करणे आणि पुनरुत्पत्ती याऐवजी काही काळ आणि शक्ती पळून जाण्यात खर्ची पडते. पण यंत्र भक्षकांपासून वाचते. ही योजना करणाऱ्या जीन्स वाढू लागल्या. पण या तऱ्हेच्या अतिरेकामुळे पाने हलली, वारा हलला तरी जीव घाबरतो, पळून जातो. भक्षकाने मारण्याऐवजी दमछाकीनेच मरतो. आता पुन्हा योजना बदलायची. विशिष्ट प्रकारची हालचाल जाणवली तरच पळून जायचे. म्हणजे पंखांच्या फडफडाटाने फुलपाखरांनी घाबरायला हवे तर वाघाच्या डरकाळीने हरणांना भीती वाटायला हवी. आता दचकण्याचे महत्त्व तुमच्या लक्षात आले असेल. समजा, एक प्राणी पाणी पिण्यात गर्क आहे. आणि एक आवाज कानावर आला. पण तो धोक्याचा इशारा आहे की नाही हे कळण्याइतके त्याच्याकडे त्या प्राण्याचे लक्षच नव्हते. मग हातातले सर्व काम टाकून निमिषार्धात तो जीव इकडची तिकडची चाहूल घ्यायला लागला. तात्पर्य दचकला. दचकण्यामुळे प्राणी अनपेक्षित धोक्याला तोंड द्यायला वायुवेगाने तयार होतो. ही मालगाडी कितीही लांबवता येईल. मुद्दा असा की जीन्स- कडून या यंत्रांना मिळणारी शिकवणूक किंवा हुकूम किंवा त्यांच्या वागणुकीचे नियोजन हे बदलत असते आणि म्हणून वेगवेगळ्या जीन्सचा प्रसार वेगवेगळ्या प्रमाणात होतो. अशा प्रकारच्या एका अर्थाने अगदी साध्या भासणाऱ्या योजनेद्वारे यंत्रांकडून फार गुंतागुंतीची कामे करून घेता येतात. एकेकाळी अशी समजूत होती की कमान बांधणे ही बांधकामातल्या कौशल्याची परिसीमा. पण गंमत म्हणजे वाळवी वारुळ बांधते त्यात कमानी असतात. आता या नखाएवढ्या अळ्यांना कमानी बांधा-

५८ / नराचा नारायण