पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्राची पहिली कुरकुर या तर्काला आधार आहे का काही ? आहे तर. प्रयोगशाळेत असा मूलद्रव्याचा रस्सा शिजवून त्यावर विश्वकिरणांऐवजी विजेच्या ठिणग्यांचा मारा केला असता रस्सा तपासल्यावर त्यात अमिनो अॅसिडस् बनल्याचे दाखवून देण्यात आले आहे. तऱ्हेतऱ्हेची अॅमिनो अॅसिडस गुंफून प्रोटीन बनतात. अशा तऱ्हेच्या रेणूंपासूनच जीवसृष्टीचा पाया असलेला डीएनएचा रेणू बनू शकतो.
 स्वतःची प्रत घडवू शकणारा रेणू बनला असे एकदा मानले की, मग उत्क्रांति- वादाचा तर्क भराभर पुढे जाऊ शकतो. हा रेणू म्हणजे जीव आणि आजूबाजूचे अणू हे त्याचे अन्न. हां हां म्हणता या रेणूच्या कोट्यवधी प्रती बनून तरंगू लागल्या असतील. ही प्रक्रिया चालू असताना चुका घडून थोड्या फरकाने वेगवेगळे रेणू बनले असतील. पुढे मुक्त अणूंचा साठा संपला असेल. मंग ज्या रेणूंचे विघटन होईल त्यांच्या- पासून इतरांना अन्नकण मिळणार. कदाचित काही प्रकारच्या रेणूंच्या धक्क्याने दुसरे रेणू विघटित होण्याला वेग येत असेल. असे हे आदिम शिकारी रेणू मग झपाट्याने वाढू लागले असतील. काही रेणूंनी अपघाताने स्वतःभोवती प्रोटीनची कवचकुंडले धारण केली असतील. ही भक्षकांवर कुरघोडी करणाऱ्या भक्ष्य जीवांच्या वंशाची सुरुवात. स्वतःच्या प्रती करणाऱ्या रेणूंची टोळी म्हणजे जीन्स. या जीन्स एका अर्थाने अमर आहेत. कारण त्या स्वतः विघटित झाल्या तरी प्रतींच्या रूपाने शिल्लक राहतात. या जीन्सव्यतिरिक्त बाकी सर्व जीवसृष्टी मिथ्या. क्षणभंगूर नश्वर प्राणी, वनस्पती, माणसे ही सगळी जणच या जीन्सच्या प्रती बनवण्याच्या उद्योगाला साहाय्यभूत होणारी यंत्रे, त्यांच्याकडून काम करून घ्यायचे. नव्या प्रती तयार झाल्यावर नाकाम झालेली जुनी यंत्रे मोडीत काढायची. या रेणूंना रिचर्ड डॉकिन्स या लेखकाने नाब दिलेय 'सेल्फिश जीन्स' : स्वार्थी जीन्स. कारण त्यांचा एकमेव शाश्वत उद्योग म्हणजे स्वतःच्या प्रती करणे. या उद्योगात ज्या जीन्स यशस्वी होतात त्या पुढे दिसतात. अयशस्वी होतात त्या दिसत नाहीत. जीन्सकडून या यंत्रांना कामाबाबत अगदी बारीक-सारीक तपशिलासकट हुकूम मिळतात. निसर्गातल्या प्रत्येक बारकाव्याचा अर्थ समजून घ्यायचा तो या मूलभूत कल्पनेच्या संदर्भात. म्हणूनच उत्क्रांतिवाद हा जीव- शास्त्राला पायाभूत ठरला आहे.

 या जीन्सच्या करामतीवर एकच मर्यादा आहे. ती म्हणजे त्यांनी बनवलेले यंत्र

अनुरूपता / ५७