पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ऑस्ट्रेलियामधे सशांच्या अफाट वाढीमुळे शेतकऱ्यांवर संक्रांत आली तेव्हा मिक्सोमा नावाचे व्हायरस जंतू सशांवर सोडण्यात आले. ससे फटाफट मरू लागले. आता अनेक वर्षांनंतर, तुरळक सापडणाऱ्या सशाचे रक्त तपासले तर त्यात मिक्सोमा व्हायरस सापडतात. पण मधल्या काळात त्यांच्यात उत्क्रांती झाली आहे. आताचा व्हायरस पूर्वीइतका जहाल, जीवघेणा राहिलेला नाही. पण जहाल व्हायरस का संपले ? याचे उत्तर असे की, या व्हायरसचा प्रसार होण्याला मलेरियाप्रमाणेच डास कारणीभूत होतात. आधी आजारी सशाचे रक्त पिऊन नंतर त्याच डासाने निरोगी सशाला चावा घेतला की, मिक्सोमा व्हायरस त्या निरोगी शरीरात शिरतात. पण डास फक्त जिवंत, उबदार सशांनाच चावत. त्यामुळे मेलेल्या सशातील व्हायरसचा पुढचा मार्ग बंद होई. म्हणून ज्या व्हायरसमुळे ससा पटकन मृत्युमुखी पडे त्यांना डासांची फ्लाइंग सर्व्हिस मिळत नसे. उलट मवाळ व्हायरसचे वास्तव्य असलेला ससा दीर्घकाळ जिवंत राहून त्यातून व्हायरसचा प्रसार अनिर्बंध होत राहिला.
 या उदाहरणाचा संदर्भ माणसाला होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनाही लागू आहे. असे मानतात की, साथीचे रोग दिसू लागले ते माणूस मोठ्या संख्येने एकत्र स्थिर जीवन जगू लागल्यानंतर आजही माणसाच्या आरोग्याला सगळ्यात मोठा धोका आहे तो साथीच्या रोगांचा. त्यामुळे सर्वात जास्त प्रयत्न हवेत ते साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्यात. हार्ट ट्रान्स्प्लांट, डायलेसिस यांचे महत्त्व दुय्यम. पण दुर्दैवाने आपल्या मेडिकल कॉलेजांमधे प्रतिबंधक उपायांचा अभ्यास करण्यासाठी कोणीच विद्यार्थी आपण होऊन पुढे होत नाहीत. त्यांना व्हायचे असते जनरल सर्जन, क्ष किरणतज्ञ किंवा प्रसूतीतज्ञ असो. साथीच्या रोगात माणूस फटकन मेला तर पुरला किंवा जाळला जातो आणि जंतूंचा प्रसार व्हायला आडकाठी येते. तुलनेने माणसाला नुसता आजारी ठेवणाऱ्या जंतूंचा प्रसार जास्त होतो. यातून रोगजंतूंची उत्क्रांती होते. याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे इन्फ्लुएंझा. पन्नास-साठ वर्षांपूर्वी हा अगदी जीवघेणा रोग होता. आज आपण मानतो की फ्लू म्हणजे दोन-चार दिवस ताप आणि आठवडाभर अशक्तपणा. संपले. इन्फ्लुएंझा उत्क्रांतीतून मवाळ झाला आहे.

 काही वेळा रोग मवाळ होतो तर काही वेळा रोगी अनुभवी होतो. यातूनच आपण रोगप्रतिबंधक लस टोचायला शिकलो. लहान मुलांना काही रोग एकदा होऊन

५४ / नराचा नारायण