पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवरण तयार करून निर्जीवासारखे पडून राहतात. यांना सिस्ट असे म्हणतात.
 दोन जीव एकमेकांना पूरक पद्धतीने जगात एकत्र येतात तेव्हा त्या संबंधांना सिंबियॉसिस ही संज्ञा वापरली जाते. आपण ज्यांना दगडफूल म्हणतो त्यात बुरशी ( फंगस) आणि शेवाळे (अल्गे) अशा प्रकारे एकत्र आलेले असतात. कडधान्यांच्या मुळावर गाठी करून राहणारे बॅक्टीरिया हेसुद्धा सिंबियॉसिसचेच उदाहरण आहे. वनस्पतीपासून बॅक्टीरियाला अन्न मिळते. तर बॅक्टीरिया हवेतील नायट्रोजन वापरून वनस्पतीसाठी नायट्रोजनयुक्त खते तयार करतात. यामुळे कडधान्याच्या पिकाला युरियासारखी खते लागत नाहीत. हे परस्परसंबंध इतके दृढ होतात की विशिष्ट कड- धान्याच्या मुळावर विशिष्ट जातीचेच बॅक्टीरिया घर करतात (याला होस्ट स्पेसिफि- सिटी असे म्हणतात. ) अर्थात ते मुदलात मातीत असायला हवेत. नसले तर सगळेच मुसळ केरात. सोयाबीन ही वनस्पती मुळात चीनमधली. तिथून ती अमेरिकेत नेण्यात आली. पण सुरुवातीला हे पीक जीव धरेना, त्यात दाणे भरेनात. कारण अमेरिकन मातीत सोयाबीनशी नाते असलेले बॅक्टीरियाच नव्हते. मग तेही चिनी मातीतून आणावे लागले. गायीम्हशींच्या पोटात गवत आणि कडब्यावर प्रक्रिया करणारे सूक्ष्म ' जीव असतात. ते हा चारा पचवण्यात गुरांना मदत करतात. अर्थात नात्याचा हा एक प्रकार झाला. एकमेकाला पूरक असलेच पाहिजे, असा नियम नाही. खरे तर कुठलाच नियम नाही. त्या संबंधातून दोन्ही जीव जगले, त्यांची वंशवृद्धी झाली, तर तसे संबंध टिकून राहतात, एवढेच.

 अशा संबंधांचा दुसरा प्रकार म्हणजे पॅरासाइट किंवा बांडगुळ, यात बांडगुळ दुसऱ्या जिवाकडून आपल्याला हवी ती वस्तू घेते पण परतफेड करत नाही. कंपाउंडच्या मेंदीवर आपण खूपदा पिवळी सुतळीसारखी वनस्पती पाहतो. हे बांडगुळच आहे. ऑर्किडची रोपेसुद्धा काही वेळा मोठ्या वृक्षावर बांडगुळासारखी वाढतात. आपल्या पोटातले जंत असेच. रोगजंतू किंवा व्हायरस हेसुद्धा बांडगुळांचेच उदाहरण. बुरशी बरेचदा बांडगुळासारखी वाढते. या बांडगुळामुळे जर यजमान जीव झपाट्याने नष्ट होत असेल तर मग बांडगुळाची पंचाइत होते. सोन्याची अंडी घालणारी हंसी कापून तिच्या पोटातली सगळी अंडी एकदम घेऊ पाहणाऱ्या हावय माणसाची कथा आहे ना? तोच प्रकार.

अनुरूपता / ५३