पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या खोल्यांची झाकणे उघडतात अन् त्या अळ्यांना पोळ्याबाहेर फेकून देतात. हा सार्वत्रिक प्रकार नाही. काही पोळ्यांमधील मधमाशा हा उद्योग करत नाहीत.
 एका शास्त्रज्ञाने सफाई करणाऱ्या अन् न करणाऱ्या माशांचा संकर घडवला. त्यातून जन्मलेली F1 पिढी सफाई न करणारी होती. म्हणजे सफाई कृती जीनमुळे ठरत असेल तर ही जीन रिसेसिव्ह असावी. F, पिढीमधे काही सफाई करणाऱ्या मधमाशा मिळाल्या, काही न करणाऱ्या तर काही अर्धवट अर्धवट मधमाशा रोगिष्ट अळयांच्या खोल्यांची झाकणे उघडून ठेवायच्या पण अळ्यांना पोळ्याबाहेर फेकायच्या नाहीत. यावरून त्या शास्त्रज्ञाने तर्क केला की सफाई काम दोन जीन्समुळे होत असावे. त्या जीन्स वेगवेगळ्या रंगसूत्रांवर असाव्यात. एका जीनमुळे झाकणे उघड- ण्याची कृती होते तर दुसरीमुळे रोगिष्ट अळ्या बाहेर फेकण्याची. दोन्ही जीन्स मिळणाऱ्या माशा सफाई करतात. केवळ पहिली जीन मिळणाऱ्या माशा फक्त झाकणे उघडतात. मग केवळ दुसरी जीन मिळणाऱ्या माशा काय करत असतील ! स्वस्थच बसणार. त्यांना रोगिष्ट अळ्यांच्या खोल्यांची झाकणे उघडून दिली तर ? तर त्यांनी फेकाफेकीचे काम चोख बजावायला हवे. या शास्त्रज्ञाने मग सफाई काम न करणाऱ्या माशांच्या पोळ्यांमधील खोल्यांची झाकणे काढून टाकली. आणि कमाल म्हणजे यातल्या काही पोळयांमधील मधमाशा लगबगीने आजारी अळ्यांना बाहेर फेकून देण्याच्या कामाला लागल्या.

 पाण्यात राहून माशांशी वैर शहाणपणाचे समजत नाहीत. मग पाण्यात राहून पाण्याशी वैर किती अडचणीचे ठरेल? त्यामुळे पाण्यातल्या प्राण्यांचा खटाटोप पाण्याशी जुळवून घेण्याचा असतो. खाऱ्या पाण्यातल्या माशांच्या शरीरातले पाणीसुद्धा खारेच हवे. त्यांना गोड्या पाण्यात सोडले तर बाहेरच्या पाण्याची घनता कमी असल्यामुळे ते त्यांच्या शरीरात शिरते. ( याला ऑसमॉसिस म्हणतात ) आणि मासा सुजतो. उलट गोड्या पाण्यातल्या माशाला खाऱ्या पाण्यात सोडले तर त्याच्या शरीरातले पाणी बाहेर जाऊन तो सुकून मरतो. पाण्यात असूनसुद्धा. पाण्याच्या तपमानाशी देखील प्राण्यांनी नीट जुळवून घेतलेले असते. जिथे तपमानात बरेच फरक होतात तिथे त्या सगळ्या तपमानांना टिकून राहण्याची खास क्षमता असलेले प्राणीच तगतात. महा- सागरात तपमानात झटपट बदल होत नाहीत. आणि झाले तर फारच उलथापालथ

अनुरूपता / ५१