पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवश्यक अन्नमिश्रित जेली ओतली. वर बॅक्टीरिया मिसळलेले पाणी शिंपडले आणि ती बशी बॅक्टीरियांना अनुकूल तपमानावर ठेवली. आता बॅक्टीरिया झपाट्याने वाढू लागतात आणि एकेका बॅक्टीरियापासून अनेक बॅक्टीरियांची कॉलनी ( समूह ) तयार होऊन जेलीच्या पृष्ठभागावर ठिपके दिसू लागतात. आता व्हेलहेट कापडाचा तुकडा या पृष्ठभागावर दाबून उचलला तर प्रत्येक कॉलनीतील काही बॅक्टीरिया कापडाला चिकटून येतात. हे कापड दुसऱ्या जेलीने भरलेल्या बशीवर दावून घरले तर त्यातले काही त्या जेलीला चिकटतात. या बशीमधेसुद्धा कॉलनीच्या स्वरूपात त्यांची वाढ होते. पहिल्या बशीतील प्रत्येक कॉलनीची प्रतिकृती दुसऱ्या बशीत तयार होते. या दोन्ही कॉलनीमधील बॅक्टीरियांच्या जीन्स सारख्याच आहेत, कारण त्या सर्व एका मूळ बॅक्टीरियापासून तयार झाल्या आहेत. आता पहिल्या बशीत पेनि- सीलिन ओतले. बहुतेक सर्व बॅक्टीरिया या बुरशीच्या हल्ल्याला बळी पडतील. अगदी तुरळक कॉलनीज शिल्लक राहतील. गुणबदलामुळे यांच्याजवळ बुरशीला तोंड देण्याची शक्ती आली. हा गुणबदल बुरशीच्या हल्ल्यामुळे झाला की आधीच झाला होता ? जर तो आधीच झाला असेल तर त्या त्या कॉलनीची दुसऱ्या बशीतली प्रति- कृतीसुद्धा या बुरशीला तोंड देण्याला समर्थ असेल. बुरशीच्या हल्ल्याचा अनुभव मिळाला नसूनसुद्धा. हा तर्क तपासण्यासाठी दुसऱ्या बशीतही पेनिसिलिन ओता. नेमक्या त्याच कॉलनीज बुरशीच्या तडाख्यातून वाचलेल्या दिसतील. गुणबदल हे परिस्थितीच्या अनुभवातून होत नसून आधीच झालेले असतात हे यावरून सिद्ध होईल. शास्त्रज्ञ याला प्रीॲडॅप्टेशन असा शब्द वापरतात. असेच गुणबदल टिकतात. बाकीच्यांचा प्रसार होत नाही.

 रोगजंतूंपासून स्वतःचा बचाव करण्याची शक्ती अनेक प्राण्यांमधे दिसते. शरीरात शिरणाऱ्या जंतूंवर हल्ला करणाऱ्या पांढऱ्या पेशींबद्दल आपण शाळेत शिकतो. मध- माशांच्या पोळ्यामधे एका विशिष्ट रोगाविरुद्ध संघटितपणे लढा दिलेला पाहून मात्र शास्त्रज्ञांना फार अचंबा वाटला. या संसर्गजन्य रोगाला ' फाउल्मूड ' असे म्हणतात. यात मधमाशांच्या अळ्या आजारी पडतात. ही साथ थांबवण्याकरता मधमाशा सफाई काम करतात. अळयांना पोळ्यातील छोट्या छोट्या षटकोनी खोल्यांमधे ठेवून वर झाकण लावलेले असते. कामकरी माशा आजारलेल्या आणि मेलेल्या अळ्या शोधतात.

५० / नराचा नारायण