पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नुसते साखरेचेच उदाहरण आपण घेऊ या. पाश्चात्य देशात मुलांना न्याहारीला लागणाऱ्या पदार्थात साखर जिकडे तिकडे पेरलेली आढळते. एकदा मुलांना या पदार्थाची गोडी लागली की कायमची मागणी निर्माण झालीच. हेच तत्त्व मांस, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांना लागू आहे. जीवनाचा झगडा इतका जबर आहे की शासनसुद्धा ह्या गोष्टींना लगाम घालू शकत नाही, अशा प्रयत्नात वेळ खर्च करण्यापेक्षा माणसाला माणूस म्हणून जगता यावे म्हणून सहकाराचा वापर करणे हेच जास्त श्रेयस्कर. थोडक्यात समाजपरिवर्तनाचा परिणामकारक मार्ग म्हणजे गरिबांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे आणि त्याबरोबरच त्यांच्यात त्यागमय वृत्तींची जोपासना करणे हा होय. पुण्यामध्ये इंदिरा कम्युनिटी किचन ही या तत्त्वावर आज कित्येक वर्षे चाललेली संस्था आहे. तेथील कामगार स्वावलंबी तर आहेतच पण सहकार्यामुळे त्यांच्या कामाचा वेग इतका मोठा आहे की दररोज तयार होत असलेले अन्नपदार्थ त्यांना निम्म्या किंमतीला विकता येतात आणि त्यामुळे इतर गरीब जनतेच्या खर्चात बरीच बचत करता येते. खेडेगावातसुद्धा याच स्वावलंबन अन् त्यागमय वृत्तीच्या तत्त्वाचा वापर शिक्षणाच्या माध्यमातून करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याकरता चांगला होतो, असा आमचा अनुभव आहे. जेथे जन्मतःच काही लोक शहाणे आणि बाकीचे मूर्ख असे चुकीचे अनुमान अनुवांशिक शास्त्रातून काढले जाते, तेथे स्पेन्सरसारखे अभ्यासक उत्क्रांतिवादाचा गैरवापर करतात असे वाटणे साहजिक आहे. मनोवृत्तीसारख्या गुणधर्माच्या अनुवांशिकतेसंबंधी अनिल गोरे यांची मूळ गृहीत तत्त्वे मला बरोबर वाटत नाहीत. माणसाला एक प्राणी समजून त्याला प्रांण्यात आढळणारे गुणधर्म लावल्यामुळे त्यांचा, त्यांचा म्हणण्यापेक्षा विल्सन, गाडगीळ वगैरे इकॉलॉजिस्ट मंडळींचा गैरसमज झाला आहे. आपल्या अर्थशास्त्रज्ञांनीसुद्धा इथेच गल्लत केली आहे. आपल्या अनुवांशिकतेची शक्ती जरी आपल्या गुणसूत्रांवर असलेल्या जीन्सने ठरविली जाते तरी प्रत्यक्षात जीन्सचे आविष्कारण आपल्याभोवती असणाऱ्या वातावरणावर आणि त्यापासून होणाऱ्या क्रिया-प्रक्रियांवर मुख्यतः अवलंबून असते. शाळेला नुसते कुंपण घातले की शाळेच्या आवारात आणि मुलांच्या कृतीत आणि जबाबदारीत आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. तेच विहीर, संडास आणि गोबर गॅस प्लॅन्टबाबतही लागू पडते. शिक्षणाच्या माध्यमातून हे परिवर्तन प्रत्यक्षात आणता येते. जसे माणसामाणसामधील विभिन्नतेचे कारण अनुवांशिक असते, तसेच माणसाचे वैयक्तिक सामर्थ्य जीनोटाईप आणि परिसर यांच्या क्रियाप्रक्रियातून होणाऱ्या आंतरविचलनाच्या स्थैर्यात असते. असे नसते तर गाल्टनने गृहीत धरल्याप्रमाणे गरीब, गरीब राहण्याचे कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि कार्यशक्तीच मुळात कमी असे आपण म्हटले असते आणि

त्याबरोबरच, शिक्षणाचा पाठांतर करण्यापलीकडे काही उपयोग नाही असा झाला असता. म्हणून ज्या वेळी आपण माणसाच्या वृत्तीविषयी बोलतो त्या वेळी उत्क्रांती हे नांव देण्यास

आठ