पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि झोपडपट्ट्या उत्तरोत्तर वाढतच आहेत. खुद्द पाश्चात्य देशातसुद्धा आपल्या झोपडपट्ट्यांसारखी कितीतरी पॉकेट्स आहेत. संध्याकाळ झाली की आपण आपापल्या घरी बंदिस्त तर नाही ना, असे सुस्थितीत राहणाऱ्या शहरातील लोकांना तेथे वाटते. चोऱ्या, बलात्कार “ threaten to become way of life over there." हे कोठपर्यंत माणूस जाऊ देणार ? आपण कोठून आलो आणि कोणीकडे चाललो आहोत हा विचार सुन्न करणारा आहे.

अनिल गोरे यांनी उत्क्रांतीचे विविध पैलू किती चांगले हाताळले आहेत हे पुस्तकातील प्रकरणांचे नुसते मथळे वाचले तरी दृष्टीस येते. " रगेल तोच तगेल" ह्या पहिल्या प्रकरणात त्यांनी डार्विनच्या नैसर्गिक सिलेक्शनच्या मूळ सिद्धांताचा तपशील दिला आहे. अफाट जननक्षमता पण प्रत्यक्षात परिस्थितीमुळे मर्यादित पुनरुत्पत्ती कशी होते हे त्यांनी जीव जीवाला कसा भक्षण करतो ह्याची उदाहरणे देऊन सांगितले आहे. त्याचबरोबर एकाच जातीच्या प्राण्यामध्ये परिस्थितीच्या रेट्यातून अन् मृत्यूच्या वरवंट्यातून मार्ग काढता काढता विविधता कशी निर्माण होते हेही सांगितले आहे. जीवनाच्या झगड्यात जे तरतात त्यांचे गुणधर्म वंशवृद्धीतून पुढल्या पिढीत कसे राखले जातात आणि प्रतिकूल गुणधर्म चाळणी लावल्यासारखे कसे काढून टाकले जातात ह्याचे पण त्यांनी वर्णन केले आहे.

डार्विनच्या सिद्धांताविरुद्ध जे वादळ उठले त्याचे वर्णन " उत्क्रांतिवाद मुर्दाबाद " या बोलक्या मथळ्याखाली दुसऱ्या प्रकरणात केले आहे. धार्मिक विरोध आपल्या बहुतेकांच्या परिचयाचा आहे. पण स्पेन्सरसारखे काही सामाजिक अभ्यासक स्वतःला डार्विनवादी म्हणवत उत्क्रांतिवादाच्या नावावर आपल्या कल्पना खपवू पाहत हे अनिल गोरे यांचे विधान मात्र पटण्यासारखे नाही. अन्न मिळविण्याची स्पर्धा आणि वंशवृद्धी यातून विविधता निर्माण होते हे जसे प्राण्यांच्या बाबतीत खरे आहे, तसेच माणसाबाबतही खरे

आहे असे म्हणण्यास मला प्रत्यवाय दिसत नाही. एका बाजूस माणसाची अन्नोत्पादन वाढविण्याची खटपट चालूच असते तर त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून, नवनवीन अन्नाचे पदार्थ कसे बनविता येतील आणि जास्त पैसा कसा मिळेल याची पण खटपट सतत सुरू असते. याचे एक उदाहरण म्हणजे विकसनशील देशात जितके धान्य खाल्ले जाते त्याच्यापेक्षा जास्त धान्य आणि कडधान्य चारा नि खुराक म्हणून गुरांना आणि प्राण्यांना विकसित देशात दिली जातात. श्रीमंताना मांस अन् दुधाचे नवनवीन पदार्थ मिळावेत म्हणून ही सर्व खटपट. परिणामी गरीब तो गरीब राहील यात आश्चर्य कसले ? श्रीमंत लोक गरिबांना परिस्थितीशी जमवून घेण्यास मुद्दाम लावतात असे मला म्हणावयाचे नाही. अन्न तंत्रज्ञानाचा कसा वापर होतो ह्यावर खुद्द श्रीमंतांचासुद्धा ताबा राहिलेला नाही.

सात