पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळते-जुळते असतात. पालेभाज्या, मटार, पापडी यांवरच्या अळ्या हिरव्या असतात. ..काही मासे हुबेहुब पाण्यात वाहणाऱ्या वाळक्या पानांसारखे दिसतात. पानाचे देठ, शिरा वगैरे सर्व नक्षी त्यांच्या अंगावर असते. त्यांना शोधणारे त्यामुळे फसतात. काही फुलपाखरांच्या अंगावर झाडांच्या सालीसारखे रेखाटन असते. त्या सालीवर बसलेले फुलपाखरू शोधून सापडणार नाही. बरेचदा या सालीवरच्या रेघा, शिरा विशिष्ट उम्या दिशेने असतात, त्यांच्यात मिसळून जाण्याकरता त्या फुलपाखराला आपल्या पंखावरच्या शिरासुद्धा उभ्याच येतील असे बसावे लागते आणि ते बसतेही. वाळवंटात निवडुंगासारख्या वनस्पती त्यांच्या काट्यांमुळे राखल्या जातात. पण दगड- गोटयांनी भरलेल्या वाळवंटी प्रदेशात काही वनस्पती दगडगोट्यांचे रूप धारण करतात. अल्जिरियात एक नाकतोडा मांडी ठोकून पंख मुडपून बसला की हुबेहूब दगडासारखा दिसतो. सगळ्या कीटकांप्रमाणे त्यालाही टी व्ही अँटेनासारख्या दोन लांब मिशा असतात. पण धोका जाणवला की, तो लगबगीने त्या मिशा गुंडाळून दडवून ठेवतो. म्हणजे त्यांच्यामुळे आपले बिंग फुटायला नको !
 बरेच कीटक भक्षक मुंग्याच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे इतर कीटकांपैकी मुंग्यांसारखे दिसणारे कीटक जास्त सुरक्षित राहतात आणि म्हणून त्यांचा प्रसार जास्त होतो. एका कीटकाच्या पाठीवर तर मुंगीच्या आकाराची पोकळ पिशवीच असते. वरून बघणाराला वाटावे, मुंगीच चालली आहे. काही आशियन आणि आफ्रिकन कोळी नाना तऱ्हेच्या हिकमती वापरून मुंग्यांसारखे दिसणारे होतात. खरे तर कोळ्यांचे शरीर गोल तर मुंग्यांचे लांबट, कोळयांना आठ पाय तर मुंग्यांना सहा. मुंग्यांच्या शरीराचा मध्यभाग अति अरुंद तर कोळ्याचा फारच रुंद, यावर उपाय काय? कोळी पुढचे दोन पाय मुंग्यांच्या मिशांसारखे नाकासमोर धरून चालतो. पाठीवर मुंगीसारखा आकार दाट रंगाचा होतो तर उरलेला भाग पारदर्शक. म्हणजे वरून बघताना मुंगी वाटते. कमाल म्हणजे मुंगीचे रूप पूर्ण होण्यासाठी तो एखाद्या कामकरी मुंगीप्रमाणे एक मेलेली मुंगी डोक्यावर धरून चालतो. गांधिलमाशीची बऱ्याच भक्षकांना भीती वाटते. मग तिच्या रूपाचीही अशीच नक्कल काही किडे करतात.

 मोठ्या आकाराच्या प्राण्यावर हल्ला करायला, शिकारी प्राणी जरा बिचकतो.

४६ / नराचा नारायण