पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही यंत्रे. ती परस्परांना छेद देऊन जातात. त्यातली जी सरस ठरतात ती आपल्याला दिसतात. बाकीची काळाच्या ओघात लुप्त होतात. हा तर्क जरी बरोबर असला, तुम्हाला अन् मला मनोमन माहीत असला, तरी वर्णनाच्या ओघात त्या प्राण्यांवर मानवी भावभावनांचे आरोप नकळत केले जातात. अहो, त्याशिवाय हरदासाची कथा रंजक व्हायची कशी ? ) फुलपाखरे किंवा हवेत उडणारे कीटक हे पाखरांचे अन्नच. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा वळीव पावसाच्या वेळी यातले काही किडे घरात दिव्याभोवती जमून आपल्याला हैराण करतात. ही वेळ म्हणजे पाखरांची मेजवानी असते. एकदा असाच पाऊस पडून गेल्यानंतर मी येरवड्याच्या पक्षी अभयारण्यात भटकत होतो. लांबून आकाशात एका जागी पाखरांची नुसती भाऊगर्दी दिसली. कावळे, चिमण्या, मैना, कोतवाल अनेक प्रकारचे पक्षी जणू एका जागी येरझारा घालत होते. कुतुहलाने जवळ गेलो, तर एका वारुळातून, पंख फुटलेल्या मुंग्या बाहेर पडून उंच कारंज्यासारख्या सरळ वर जात होत्या आणि पाखरे त्यांना टिपत होती. यावर मुंग्यांचा उपाय म्हणजे या पाखरांना पुरून उरेल इतकी पुनरुत्पत्ती करायची. दुसरा उपाय - हा मुंग्यांना साधलेला नाही, पण इतर किड्यांना साधतो- म्हणजे आपल्या शरीरात घाणेरडा वास येणारी, घाणेरडी चव असणारी द्रव्ये तयार करायची. अशी नको वाटणारी द्रव्ये शरीरात असणारी बरीच फुलपाखरे असतात. त्यांचे रंग, त्यांच्या पंखांचे आकार, त्यावरील नक्षी ही सर्व अगदी लक्षवेधक असतात. असे का असेल ? खरे तर किडे स्वतःला लपवतील तर वाचतील. डार्विनला याचे उत्तर सुचले. समजा, चवीला घाणेरडी असणाऱ्या फुलपाखरात काही लक्षवेधक असतील, तर काही नसतील. हा योगायोगाने होणाऱ्या गुणबदलाचा परिणाम. पण मग पक्ष्यांना कळून येईल की, ही लक्षवेधक फुलपाखरे न खाणे बरे. त्यांची शिकार करणे म्हणजे व्यर्थ खटाटोप. त्यामुळे हा लाल कंदील लावणाऱ्या फुलपाखरांची शिकार कमी होईल. यातून वंशवृद्धी घडेल.

 पण याच तर्काचा आणखी एक अनपेक्षित परिणाम पाहा. ज्यांची चव घाणेरडी नाही, अशा फुलपाखरांपैकी काही गुणबदलाने त्या लक्षवेधून घेणाऱ्या फुलपाखरांच्या रंगाची, आकाराची, नक्षीची होतील. त्यांच्याकडे पाहून पक्षी त्यांची शिकार करणार नाहीत. झाली यांची वंशवृद्धी अधिक वेगाने सुरू! यांना म्हणायचे निसर्गातले

अनुरूपता / ४३